नागपूर, ता. २१ : हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करू न शकणाऱ्या व्यक्तींसाठी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ‘महापौर नेत्र ज्योती’ योजनेची संकल्पना मांडली. महात्मे नेत्रपेढी यांच्या सहकार्याने ही योजना अंमलात आली असून याअंतर्गत शनिवारी (ता. २०) उत्तर नागपुरातील टेका नाका परिसरात मनपाच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक महेंद्र धनविजय, निरंजना पाटील, सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, शेषराव गोतमारे, गोपी कुमरे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, डॉ. विजय जोशी, डॉ. ख्वाजा, प्रभाकर येवले, शिवनाथ पांडे, उत्तर नागपूर भाजप अध्यक्ष संजय चौधरी, भाजपचे उत्तर नागपूर महामंत्री गणेश कानतोडे, सुरेंद्र यादव, जितेंद्र ठाकूर, संपर्क प्रमुख चैतराम हारोडे, संजय तरारे, राजेश वाटवानी आदी उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, या शहरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे आणि नागरिकांना उत्तम आरोग्य सोयी उपलब्ध व्हाव्यात, याबाबत नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरात ७५ हेल्थ पोस्ट तयार होत आहे. किमान प्राथमिक उपचार घराजवळच तातडीने मिळावे, हा यामागील उद्देश आहे. गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावे यासाठी सहा विधानसभा मतदारसंघात सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. ‘सुपर ७५’ अंतर्गत मनपा शाळांतील ७५ विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षांच्या दृष्टीने तयार करण्याचा संकल्प केला आहे. महापौर नेत्र ज्योती अंतर्गत आता आर्थिकदृष्ट्या ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया शक्य नाही, त्यांच्यावर महात्मे नेत्र पेढीच्या सहकार्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या जनोपयोगी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केली.
नेत्रतपासणी साठी परिसरातील नागरिक शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तपासणीनंतर ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्यावश्यक आहे, त्यांच्यावर महात्मे नेत्रपेढीत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरीत नागरिकांना आवश्यक तो वैद्यकीय सल्ला, आवश्यक असल्यास चष्मे देण्यात येणार आहे. शिबिरात डॉ. महात्मे नेत्रपेढी तर्फे डॉ.सुरभी, डॉ. अरविंद, विभांशु, संचिता, नूरसभा उपस्थित होते. यावेळी लाला कुरेशी, रवींद्र डोंगरे, राजेश हाथीबेड, अमित पांडे, दिलीप गौर उपस्थित होते.