- नागपुर समाचार, मनपा

गांधीसागर तलावाचे होणार सौंदर्यीकरण महापौरांसमक्ष प्रस्तावित कामाचे सादरीकरण

नागपूर, ता. १३ : नागपूर महानगरपालिकेतर्फे महाराष्ट्र शासनाच्या व मनपाच्या निधीतून पर्यटनाला चालना देण्यासाठी ऐतिहासिक गांधीसागर तालाबचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या समक्ष शुक्रवारी (ता.१३) प्रस्तावित विकास कामाचे सादरीकरण करण्यात आले.

          यावेळी आमदार प्रवीण दटके, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी आदी उपस्थित होते. 

            गांधीसागर तलावाच्या विकास व सौंदर्यीकरणासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे निधी प्राप्त झालेला आहे. ध्रुव कन्सल्टन्सी कंपनीचे आर्कीटेक्ट संदीप जोशी यांनी सांगीतले की,  तलावाच्या सर्व बाजूंचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. येथे पायी चालण्यासाठी ट्रॅक,  प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था असेल. तलावाच्या मध्यभागी आकर्षक कारंजे बसविण्यात येतील.  अम्यूजमेंट करिता बालभवनलगत मोठी इमारत बांधण्यात येणार आहे.  तलावाच्या मध्यभागी असलेल्या भाऊजी पागे उद्यानापर्यंत जाण्याकरीता एक पूल बांधण्यात येईल. तलावामध्ये साचलेला गाळसुध्दा काढण्यात येईल. तसेच येथे येणा-या  घाणपाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

           गांधीसागर तलाव हा हेरीटेज तलाव आहे. पुरातन वास्तूचे जतन करुन तशाच पध्दतीने या तलावाचे विकास कार्य करण्यात येईल. महाराष्ट्र शासनातर्फे १२ कोटी रुपये आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे २.९० कोटी रुपयांचे प्रावधान विकास कार्यासाठी करण्यात आले आहे. हे विकास कार्य झाल्यानंतर ऐतिहासिक तलावाचे जतन तर होईलच तसेच सौंदर्यीकरणामुळे मोठया प्रमाणात पर्यटक सुद्धा गांधीसागर तलावाकडे वळतील, असा विश्वास महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

            यावेळी धंतोली झोनचे कार्यकारी अभियंता उज्वल धनविजय, उपअभियंता प्रफुल्ल आसनकर व कनिष्ठ अभियंता नीलेश सांभारे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *