थॅलेसिमिया व सिकलसेल योद्ध्यांचा सत्कार
नागपूर समाचार : थॅलेसिमिया व सिकलसेलमुळे लाखो लोकांचे जीवन संकटात आहे. त्यांच्यावर उपचाराची जेवढी गरज आहे, तेवढीच या आजाराबाबत समाजामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.
थॅलेसिमिया अँड सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने एनरिको हाईट्स येथे आयोजित कार्यक्रमात ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते थॅलेसिमिया व सिकलसेल योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी, बाल आयुष फाउंडेशनचे संचालक ललित परमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘पूर्व विदर्भात या आजाराने अनेक रुग्णांना ग्रासले आहे. उत्तर नागपुरात तर हजारो रुग्ण आहेत. यापूर्वी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये शंभर मुलांचे बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन झाले. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, ते आज आत्मविश्वासाने जीवन जगत आहेत. नागपुरात कायमस्वरुपी ही व्यवस्था असावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’ या आजारातून रुग्णांना मुक्ती देण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करेन, असा विश्वासही ना. श्री. गडकरी यांनी दिला.
यावेळी ललित गजनाडे, वीरेंद्र ठवरे, स्मृती चोबीतकर, तितीक्षा उमाळे, नर्गिस अहमद, महेक, गिरीश डोंगरे, डॉ. क्षितिज सूर्यवंशी, इप्शिता शंभरकर, सौरभ वासेकर, सिद्धार्थ चहांदे, प्राजक्ता चौधरी, संजीवनी सातपुते, पंकज रुघवानी, संगीता रुघवानी, दीपांश रुघवानी, कमलजीत कौर या सिकलसेल योद्ध्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणोती बागडे यांनी केले.
‘हां मै थॅलेसिमिया पेशंट हुं’
बोन मॅरो ट्रान्सप्लान्टसाठी केलेल्या सहकार्याबद्दल रुग्णांनी ना. श्री. गडकरी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर त्याचवेळी तीतिक्षा उमाळे या सिकलसेलग्रस्त तरुणीने रुग्णांची व्यथा कवितेच्या माध्यमातून सकारात्मकरित्या मांडली. ‘हां मै एक थॅलेसिमिया पेशंट हुं…मैं असेही जीवन जिती हुं’ या तिच्या कवितेला उपस्थितांची दाद मिळाली. तर ‘साहेब, आमच्या जीवनातील रस्ते पण चांगले बनवाल ना?’ अशी आर्त साद देणारी कविताही तिने सादर केली.




