- नागपुर समाचार

कोविडमुळे पती गमावलेल्या महिला व अनाथ मुलांनी विशेष सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

नागपूर समाचार : कोविडमुळे पती गमावलेल्या महिला व अनाथ मुलांनी विशेष सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी

असाहाय्य नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन

नागपूर समाचार, दि. ६ :  कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना सावरण्यासाठी सामाजिक, राजकीय, संस्थात्मक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी संस्थांनी प्रशासनासोबत मदतीसाठी पुढे यावे. विधवा महिला, अनाथ मुलांना विशेष सहाय्य योजनेतून अशा नागरिकांना अनुदान दिले जात असून जिल्ह्यातील जवळपास चारशे सेतू केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध केली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे. कोरोना संकटात गरीब कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाले. अनेक घरातील कर्ते पुरुष या आजारात बळी पडले, अशा कुटुंबांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. नागपूर जिल्ह्यात बऱ्याच महिला विधवा व मुले अनाथ झालेली आहेत. त्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जाना सभेमध्ये मंजुरी देऊन लाभ सुरू करण्यात आला आहे. तरीदेखील जिल्ह्यामध्ये काही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वंचित लोकांना आर्थिक साहाय्य मिळावे यासाठी सामाजिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी देखील पुढाकार घ्यावा, अशा नागरिकांना जवळच्या सेतू केंद्रांमध्ये पाठवावे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर विशेष सहाय्य योजनेतून त्यांना आर्थिक लाभ दिला जाणार आहे अशा गरीब, गरजू कुटुंबांना यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अपंगाचे प्रमाणपत्र, असमर्थतेचा, रोगाचा दाखला, अपंग असल्याचे प्रमाणपत्र, अशा जुजबी प्रमाणपत्राच्या सादरीकरणानंतर महाऑनलाईन केंद्र किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात अर्ज सादर केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी स्वतः नागरिकांनीदेखील पुढे यावे. तहसील कार्यालय, नगर परिषद, सर्व महा ऑनलाईन केंद्र सेतू केंद्र या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक गावातील, शहरातील सर्व दारिद्रय रेषेखालील नागरिक यासाठी पात्र आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना याचा लाभ मिळेल यासाठी शासकीय यंत्रणा, सामाजिक संघटनांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

विशेष सहाय्य योजने अंतर्गत राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविल्या जातात. या योजनेमार्फत अंध, अपंग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परितक्त्या, देवदासी तसेच 65 वर्षावरील निराधार वृद्ध यांना राज्य शासनामार्फत 1000 रुपये दर महिन्याला अर्थसहाय्य वितरित करण्यात येते. तसेच केंद्र पुरस्कृत दारिद्र रेषेखालील वृद्ध व्यक्तींकरिता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, विधवा महिलांकरिता इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग व्यक्ती करिता इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील 59 वर्षापेक्षा कमी वय असलेला कर्ता पुरुष किंवा स्त्री मरण पावल्यास वीस हजार रुपये, एकरकमी अर्थसहाय्य वितरित करण्यात येते. नागपूर जिल्ह्यातील 14 तहसील कार्यालयामध्ये व सेतू केंद्र या ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा आहे, नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *