- नागपुर समाचार, मनपा

नैसर्गिक प्राणवायूसाठी ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती : महापौर दयाशंकर तिवारी ओंकार नगरात फुलणार विविध झाडे : २५ लाख रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण

नागपूर, ता. २४ : प्राणवायूची किंमत कोरोनाने नागरिकांना करवून दिली. ऑक्सिजनच्या तुटवड्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढे ही परिस्थिती उदभवू नये यासाठी नागपुरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून ‘ऑक्सिजन पार्क’ तयार करण्यात येत आहे. यातून मिळणारा नैसर्गिक प्राणवायू नागपूरकरांसाठी खऱ्या अर्थाने ‘प्राणवायू’ ठरेल, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

हनुमान नगर झोन अंतर्गत ओंकार नगर परिसरातील विणकर कॉलनीमधील सेंटर पॉईंट स्कूलजवळील मैदानात शनिवारी (ता.२४) वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, नगरसेविका मंगला खेकरे उपस्थित होत्या.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, यंदा स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने नागपुरात अनेक उपक्रम राबविले जात आहे. ७५ हेल्थ पोस्ट हा त्यातील वर्क महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. ‘ऑक्सिजन पार्क’ ही संकल्पना कोरोनाच्या निमित्ताने समोर आली. याअंतर्गत आता शहरातील विविध परिसरात खुल्या जागी वृक्ष लागवड करून लोकसहभागाने त्याचे संगोपन करण्याचा संकल्प मनपा पदाधिकारी आणि नगरसेवकांनी केला आहे. मागील महिनाभरात हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. यापुढेही हा उपक्रम निरंतर सुरू राहणार, असे ते म्हणाले.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपस्थित मनपा पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. यानंतर विणकर वसाहत मैदान आणि स्वराज नगर मैदान येथेही स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या मनपा विशेष निधीतून २५ लाख खर्चून तयार करण्यात आलेल्या ट्रॅक आणि अन्य विकास कामांचे लोकार्पण महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *