- मनपा

वीर सैनिकांचे बलीदान विसरणे हे अशक्यच : महापौर दयाशंकर तिवारी 

वीर सैनिकांचे बलीदान विसरणे हे अशक्यच : महापौर दयाशंकर तिवारी 
श्रद्धांजली कलशाला अभिवादन करून कारगील प्रवासासाठी दिल्या शुभेच्छा
नागपूर, ता. २४ :  देशातील वीर सैनिकांनी आपल्या रक्ताभिषेकाने भारत मातेचे पूजन केले आहे. वीर जवानांच्या या बलीदानामुळेच आपण सुखाचे आयुष्य जगत आहोत. या सर्व शहीद जवानांचे बलीदान विसरणे हे अशक्यच आहे, अशी भावना महापौर दयाशंकर तिवारी यांनी कारगील श्रद्धांजली कलशाला अभिवादन करताना व्यक्त केली.
कारगिलच्या युध्दात वीरमरण आलेल्या सैन्याच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी रवाना झालेले श्रद्धांजली कलश शनिवारी (ता.२४) नागपूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. नगरीच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी सपत्नीक या श्रद्धांजली कलशाचे दर्शन घेतले व कलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कारगीलला हे कलश घेऊन जाणाऱ्या जवानांच्या चमूला त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
याप्रसंगी रेल्वेचे स्थानक निदेशक दिनेश नागदेवे, स्थानक उपव्यवस्थापक डी. पी. गाडगे यांच्यासह कारगील युद्धातील शहीद राजदेव रेड्डी यांची कन्या आदी उपस्थित होते.
सिटीजन्स सोसायटी ऑफ इंडियामार्फत कारगील यात्रा करीत शहीदांच्या स्मृती स्थळी अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली कलश देशातील विविध भागातून भ्रमण करीत नेण्यात येत आहेत. शनिवारी (ता.२४) दुपारी ३.५५ वाजता कॅप्टन एस. सी.भंडारी, श्री. दिनेश, बी.पी.शिवकुमार, श्री. नारायण, कुमार स्वामी हे श्रद्धांजली कलशासह नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. या कलशांना अभिवादन करून महापौर दयाशंकर तिवारी यांनी देशभर भ्रमण करून पवित्र कलश घेऊन जाणाऱ्या संपूर्ण चमूचे धन्यवाद मानून त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना महापौर म्हणाले, भारतीय जवानांच्या शौर्याची, धैर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणारे कारगील युद्ध आहे. विपरीत परिस्थितीत पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी थोपवून लावीत भारतीय जवानांनी देशाची विजयी पताका उंचावली. या अभिमानास्पद क्षणासाठी अनेक जवानांनी आपल्या रक्ताने भारतमातेचे अभिषेक केले. या शाहीदांचे योगदान या देशातील कुणीही नागरिक विसरू शकणार नाही, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.
कारगील यात्रेअंतर्गत देशातील विविध भागातून मार्गक्रमण करीत श्रद्धांजली कलश २६ जुलै रोजी कारगील विजय दिनी दिल्ली येथील इंडिया गेट येथे पोहोचेल. तिथे शहीद जवानांच्या स्मृतिस्थळी श्रद्धांजली कलश अर्पण केले जाणार आहेत. या श्रद्धांजली कलशामध्ये देशातील विविध प्रांतातील नद्यांचे पाणी व विविध प्रांतातील मुलांनी त्यात अर्पित केलेल्या फुलांच्या पाकळ्या आहेत. रेल्वे स्थानकावरून ‘भारत माता की जय’चे नारे देत श्रद्धांजली कलश रवाना करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *