- मनपा

के.टी. नगर रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाचा शुभारंभ

एनएसएससीडीसीएल व पर्सिस्टंट फाउंडेशनचे मनपाला सहकार्य : महापौर व आयुक्तांनी मानले आभार

नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या काटोल मार्गावरील के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उभारण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा मंगळवारी (ता.२०) महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते शुभारंभ झाला. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसएससीडीसीएल) व पर्सिस्टंट फाउंडेशन यांच्या समन्वयातून मनपाला सहकार्य भावनेतून हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे.


प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समितीचे उपसभापती विक्रम ग्वालबंशी, माजी महापौर मायाताई इवनाते, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, नगरसेवक हरीश ग्वालबंशी, नगरसेविका डॉ.परिणिता फुके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी डॉ. ग्रीष्मा धिंग्रा, एनएसएससीडीसीएल ई-गव्हर्नंस विभागाचे महाप्रबंधक डॉ. शील घुले, मुख्य नियोजक राहुल पांडे, पर्सिस्टंट फाउंडेशनचे नागपूर सेंटर हेड रोहित भार्गव, नागपूर ॲडमिन योगेश करमरकर, सीएसआर समन्वयक अक्षिता व्यास आदी उपस्थित होते.
प्रारंभी महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. व अन्य मान्यवरांनी फित कापून ऑक्सिजन प्रकल्पाचा शुभारंभ केला. त्यानंतर प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पातून ५० खाटांच्या के.टी.नगर रुग्णालयाला ऑक्सीजन पुरवठा होऊ शकतो. यावेळी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये नागपूर महानगरपालिकेने शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी नागरिकांच्या सहकार्याने गरीब, गरजू, मजूर, असंघटीत कामगार यांचे भोजन, स्थलांतरीत कामगारांचे प्रवास, बेघरांसाठी निवारा आदी संदर्भात मदत केली. दुस-या लाटेत मात्र परिस्थिती विपरीत होती. यावेळी नागरिकांना औषधे, ऑक्सिजन, रुग्णालयात बेड यासाठी संघर्ष करावा लागला. पहिल्या लाटेत नागरिकांना आवश्यक सुविधा या पैशाच्या माध्यमातून पुरविता आल्या. मात्र दुस-या लाटेत पैसे असूनही हतबलता दर्शविण्याच्या वेळ आली. अशी स्थिती पुन्हा आपल्या शहरात येउ नये, ऑक्सिजन अभावी कुणाचेही हाल होउ नये, यासाठी शहरात मनपाच्या दवाखान्यामध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याबाबत एनएसएससीडीसीएल चे डॉ.शील घुले यांच्याशी संवाद साधला. त्यांनी पर्सिस्टंट फाउंडेशनकडे त्याबाबत चर्चा केली. पर्सिस्टंटचे प्रमुख अधिकारी समीर बेंद्रे कडून यासाठी लगेच मंजुरी प्राप्त झाली. सर्व कार्यवाही पूर्ण करून आज प्रकल्प पूर्णत्वास आल्याचा आनंद असल्याचे महापौर म्हणाले. जन आरोग्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी आणि पर्सिस्टंटने घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी दोन्ही संस्थांचे आभार मानून शहरातील आरोग्य सुविधेसंदर्भात इतर संस्थांनीही पुढे येण्याचे आवाहन केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून आता के.टी.नगर रुग्णालय ऑक्सीजनसाठी आत्मनिर्भर झाला आहे. या कार्यात नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांचे विशेष सहकार्य लाभले.
सीएसआर निधीमधून पर्सिस्टंट फाउंडेशनद्वारे पुढाकार घेउन मनपाला ऑक्सिजन प्रकल्प उभारून दिल्याबद्दल मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही आभार मानले. कोव्हिडसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्या परिस्थितीचा सामना करण्यास शहरातील अशा प्रकल्पाच्या माध्यमातून यश मिळणार आहे.

सामाजिकदायित्वातून पर्सिस्टंट फाउंडेशनने उचललेले पाउल हे स्तूत्य असून शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने इतर संस्थांनीही असा पुढाकार घेण्याची तयारी दर्शविल्यास मनपा प्रशासन पूर्णत: त्यांना सहकार्य करेल अशी ग्वाही आयुक्तांनी यावेळी दिली. महापौर आणि आयुक्तांच्या हस्ते पर्सिस्टंट कंपनी ला आभार पत्र देण्यात आले. यावेळी महापौरांच्या हस्ते पर्सिस्टंट कंपनीचे रोहित भार्गव, योगेश करमरकर आणि अक्षिता व्यास यांचा शाल, श्रीफळ व मनपाच्या मानाचा दुपटटा देऊन सत्कार करण्यात आला.
पर्सिस्टंट फाउंडेशनच्या सीएसआर समन्वयक अक्षिता व्यास यांनी प्रकल्पाच्या उभारणीची पार्श्वभूमी विषद केली. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे मनपाच्या के.टी.नगर रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

नागपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपणही योगदान देउ शकतो या सामाजिक भावनेतून पर्सिस्टंटद्वारे यासाठी लगेच सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

प्रकल्पातील मशीन्स या सिंगापूरवरून मागविण्यात आलेल्या असून यासाठी लागलेला सुमारे ४५ ते ५० लाख रुपये खर्च पर्सिस्टंटद्वारे उचलण्यात आलेला आहे. प्रकल्पाची एकूण क्षमता २५० एलपीएम एवढी आहे. प्रकल्पाच्या देखरेखीची जबाबदारी मनपा आणि पर्सिस्टंट फाउंडेशन संयुक्तरित्या निभावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नागपूर स्मार्ट सिटीचे अनूप लाहोटी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *