- विदर्भ

कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थांना ३१ हजाराची सानुग्राह मदत महापौर राखी संजय कंचर्लावार यांची घोषणा

चंद्रपूर, ता. २८ : कोरोनाच्या महामारीत अनेकांचा मृत्यू झाला. घरचा कर्ता परुष, महिला यांचा मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले. लहान मुले पोरकी झाली. हे दु:ख फार मोठे आहे. अशा या संकटाच्यावेळी पाल्यांना मदतीची गरज आहे. महानगरपालिकेच्या शाळांतील पालकांना गमावलेल्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३१ हजार रुपये सानुग्राह मदत देत असल्याची घोषणा महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली.

सोमवारी (ता. २८) चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम आढावा नियोजन बैठक पार पडली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्यासह मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत, मनपाच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार म्हणाल्या, मुलं देशांचे भवितव्य आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे शिक्षकांनी मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या पोषण आहार व खानपान याबाबत जनजागृती करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे स्वत:सह आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी. संचारबंदीमुळे विद्यार्थी मैदानी खेळ विसरले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासोबतच ऑनलाईन व्यायाम आणि घरच्या घरी कोणते खेळ घेता येईल का, यावरही शिक्षकांनी विचार करावा, असे महापौरांनी आवाहन केले.

महापौर पुढे म्हणाल्या, मागील वर्षी पहिल्या लाटेच्या वेळी मनपाच्या शिक्षकांनी अभिनव प्रयोग करून विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. दर्जेदार शिक्षणामुळे मनपाच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, याबद्दल महापौरांनी शिक्षकांचे कौतुक केले.

मनपाचे शिक्षण विभाग खूप चांगले कार्य करत आहे. कोरोनाच्या काळापासून ऑनलाईन क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांना अविरत शिक्षण देत आहेत. यापुढेही असेच कार्य करत राहावे, असे आवाहन स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी केले.

 

शिक्षणाधिकारी नागेश नीत यांनी प्रास्ताविक सांगितले, कोरोनाच्या महामारीमुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या शाळांतील ३ विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले. यात दोघांनी आई तर एकाने वडील गमावला. अशा संकटकाळात या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहू, असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *