
अवधूत व मंगला जोशी यांनी पत्रपरिषदेत दिला इशारा
नागपूर समाचार २८ : आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करणारे व तुरुंगांत राहिलेल्या मिसाबंदींना सन्मान निधी देण्यात यावा, अशी मागणी अवधूत जोशी आणि त्यांच्या पत्नी मंगला जोशी यांनी पत्रपरिषदेत केली. याकरिता त्यांनी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला. लोकशाही वाचविण्यासाठी शेकडो लोकांनी १९७५ ते ७७ यादरम्यान सत्याग्रह केला होता. त्यावेळी इंदिरा गांधींनी अनेकांना तुरुंगात डांबले होते.
आज बहुतांश मिसाबंदी भोगलेले वयोवृद्ध झाले आहेत. त्यांच्याकडे उपजीविकेचे कुठलेही साधन नाही. एकवेळच्या जेवणाचीही सोय नाही. आम्ही सरकारकडे भीक मागत नाही. अधिकार मागत आहोत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आवाहनानुसार हजारो स्वयंसेवकसत्याग्रह आंदोलनात सहभागी झाले होते. आज केंद्रात भाजपची सत्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः स्वयंसेवक आहेत. आता त्यांनी इतर स्वयंसेवकांचे दुःख जाणून घ्यावे. तुम्ही सर्वांची चिंता करता, असे सांगता. त्याचप्रमाणे सन्माननिधी देऊन मिसाबंदींचीही काळजी घ्यावी, असे पत्र जोशी दाम्पत्यांनी पंतप्रधानांना लिहिले आहे. ‘सब का साथ सबका विकास” या घोषणेमध्ये मिसाबंदीचा समावेश करावा असेही जोशी म्हणाले.
जोशी यांच्या मागण्या
- भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावे
- अखंड भारताची निर्मिती करावी
- भारताला आरक्षण मुक्त करावे