- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर : महाजेनकोने कमी खर्चात स्वस्त वीजनिर्मितीकडे लक्ष द्यावे – नितीन राऊत

नागपूर : १४ मार्च – या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी महाजेनकोने ग्राहकांना स्वस्त वीज व खर्च कमी करण्यावर अधिक भर द्यायला हवा, याकडे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लक्ष वेधले. ऊर्जामंत्र्यांनी कोराडी औष्णिक वीज केंद्राची पहाणी केली. त्यानंतर राज्यातील सर्व वीज निर्मिती केंद्रांच्या मुख्य अभियंत्यांशी दृक्श्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक (खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक (प्रकल्प) व्ही. थंगापांडीयन, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक अभय हरणे, संजय मारुडकर, कैलाश चिरुटकर, नितीन चांदूरकर सहभागी झाले होते. 

महाजेनकोने मागील ६० वर्षात प्रथमच वीज उत्पादनाचा उच्चांक गाठला असून विक्रमी १०४४५ मेगावॅट वीज निर्मिती केली. या कामगिरीबद्दल तसेच कोरोनाच्या काळात अत्यंत विपरीत परिस्थितीचा सामना केल्याबद्दल त्यांनी सर्व अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कामगारांचे कौतुक तसेच विशेष अभिनंदन केले. वीज निर्मितीत महाजेनकोने आतापर्यंत मोठा पल्ला गाठला आहे, यामुळे सर्वाधिक वीज उत्पादनाचा विक्रम महाजेनकोच्या अभियंता व कर्मचाèयांमुळे शक्य झाला आहे. यापुढील काळ हा स्पर्धेचा आहे. अधिकाधिक व्यावसायिक पद्धतीने कामकाज करावे लागणार आहे. यासाठी वीज निर्मिती करताना अनावश्यक तसेच ऑपरेशन व मेंटनन्सचा खर्च कमी आणि बेस्ट प्रॅक्टिसेसचा अवलंब करावा लागेल. गुणवत्ता व न्यूनतम उत्पादन खर्चाचा मेळ घालावा लागेल, याची जाणीव ऊर्जामंत्र्यांनी करून दिली. महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी आगामी आव्हानांचा यशस्वी सामना करण्यासाठी महानिर्मिती सज्ज असल्याची ग्वाही दिली. मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.