- Breaking News, मनपा

नागपुर : झिरो माईल संदर्भात १५ दिवसात सल्लागार नियुक्त करा

हेरिटेज संवर्धन समितीचे निर्देश : जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड – १ हेरीटेज झिरो माईलच्या संदर्भात येत्या १५ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीतर्फे देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता.२९) जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेरिटेज संवर्धन समितीची बैठक घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत हेरिटेज संवर्धन समितीचे सदस्य मनपा उपायुक्त मिलींद मेश्राम, स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, एल.ए.डी. महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला चक्रदेव, नागपूर वस्तू संग्रहालयाच्या क्यूरेटर जया वाहने, नीरीचे संचालक डॉ.तपन चक्रवर्ती, हेरिटेज संवर्धन समितीचे सदस्य सचिव तथा सहायक संचालक नगररचना हर्षल गेडाम, नागपूर सुधार प्रन्यासच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्धन भानुसे, तहसीलदार नझुल सीमा गजभिये, वास्तुविशारद अर्बन डिझायनर अशोक मोखा, माहिती विभागाचे अनिल गडेकर, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते.

झिरो माईल व कस्तुरचंद पार्क या दोन्ही हेरिटेजचे व संवर्धन व संरक्षणासाठी लागणारा खर्च हा हेरिटेज निधी मधून करण्यात येणार आहे. हा संपूर्ण खर्च नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास करतील.

मनपा आणि नासुप्र द्वारे हेरिटेजचा निधी कुठे व किती खर्च झाला याचा अहवाल सुद्धा १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीतर्फे देण्यात आले. बैठकीत उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे झिरो माईलचे सौंदर्यीकरण, संवर्धन करण्यासाठी किती जागा उपलब्ध आहे याचीसुध्दा माहिती उपलब्ध करण्याचे निर्देश समितीने दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *