पालकांसाठी एक महत्त्वाचे माहिती सत्र व लहान मुलांवर विकासाचा भर
संस्कार हेच खरे शिक्षण- निलेश काळे
नागपूर समाचार : एडुसन फाउंडेशन तर्फे आयोजित “बालसंस्कार शिबिर – २०२५” चे आयोजन उत्साहात करण्यात आले असून, यामध्ये लहानग्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे. १४ सप्टेंबर रोजी पालकांसाठी एक माहिती सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये शिबिराचे समन्वयक डॉ. निलेश काळे यांनी शिबिराची सविस्तर माहिती दिली.
डॉ. काळे यांनी सांगितले की, “संस्कार हेच खरे शिक्षण” या संकल्पनेतून शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शिबिराद्वारे मुलांमध्ये आत्मविश्वास, नैतिक मूल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास घडवणे हाच मुख्य उद्देश आहे असे स्पष्ट केले. हे शिबिर एकूण ५ सत्रांमध्ये दर रविवारी घेण्यात येणार असून या शिबिराद्वारे मुलांना नैतिक मूल्यांचे शिक्षण,व्यक्तिमत्त्व विकासाचे, खेळ, योग व कथाकथन, कला व हस्तकला, बौद्धिक व सांस्कृतिक उपक्रम याचा लाभ घेता येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मिडीयातील संपर्क मित्र देवराव प्रधान होते. तसेच विशेष अतिथी म्हणून प्रताप काशीकर व दिलीप तांदळे यांची उपस्थिती लाभली. मुख्य अतिथी यांनी बालसंस्कार शिबिराचे महत्व अधोरेखित केले व पालकांना या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रताप काशीकर यांनी पालक व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला व बालसंस्कार शिबिराच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “आजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांमध्ये चारित्र्य आणि संस्कार रुजविणे अत्यंत गरजेचे आहे, आणि अशा शिबिरांद्वारेच ते शक्य आहे असे मत व्यक्त करून संस्थेच्या या उपक्रमास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संचालन संस्थेच्या सहसंचालिका सरोज काळे यांनी केले. यावेळी नरेश हिवसे व डॉ. हरीश वानखेडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.




