थकबाकी वसुलीला अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे; मनपा आयुक्तांनी घेतला मालमत्ता कर वसुलीचा आढावा
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने या आर्थिक वर्षात १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत १२६ कोटी ५९ लाख रुपयांची वसुली केली आहे. कर वसुली संदर्भात आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी विभागाचे कौतुक केले. तसेच मालमत्ता कर थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्या, अधिकाधिक कर वसुलीवर भर द्यावा, असे निर्देश आयुक्तांनी बैठकीत दिले.
मनपा आयुक्तांनी गेल्या मार्च महिन्यात महानगरपालिकेचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना मालमत्ता कराच्या वसुलीला प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. यात या आर्थिक वर्षात ४०० कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मालमत्ता कराच्या वसुलीच्या संदर्भात आढावा बैठक महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त गणेश राठोड, नगररचना विभागाचे उपसंचालक ऋतुराज जाधव, सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त व झोन अधिकारी, कर अधीक्षक उपस्थित होते.
गेल्या १ एप्रिलपासून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत मनपाच्या मालमत्ता विभागाने १२६ कोटी ५९ लाख ५५ हजार रुपयांची कर वसूल केला आहे. यात ३७ कोटी ४७ लाख ही थकबाकी असून, ८९ कोटी ११ लाख रुपये हे या आर्थिक वर्षातील कराचा समावेश आहे. बैठकीत आयुक्तांनी सर्वात कमी वसुली झालेल्या झोन अधिकाऱ्यांना नोटीस बजाविण्याचे निर्देश दिले. तसेच २५ लाखपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिली.
सध्या मालमत्ता कराच्या जाळ्यात नसलेल्या मालमत्तांवर कर लावण्यासाठी सर्व झोनच्या अधिकाऱ्यानी प्राधान्याने लक्ष द्यावे, यासंदर्भात दर महिन्याला या कामाचा आढावा घेण्यात यावा, असेही यावेळी सुचविण्यात आले. मालमत्ता धारकांना डाक विभागामार्फत देयके पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महानगरपालिकेने डाक विभागाला २ लाख ८९ हजार ४०९ देयके सोपविली होती. यापैकी डाक विभागाने २ लाख २५ हजार ५४१ देयके डाक विभागाने संपत्तीधारकांना वितरीत केले आहे. यापैकी ३८ हजार ८३४ देयके मात्र डाक विभागाकडून परत आली आहेत. यासाठी मालमत्ताधारकांचे पत्ते अद्यावत करणे तसेच मोबाईल क्रमांक मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी यावेळी सांगितले. तसेच थकबाकीदारांना प्रत्येक महिन्यात थकीत रक्कम भरण्यासंदर्भात एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.




