पुणे समाचार : केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, लोकमान्य टिळक हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्त्रोत आणि आदर्श आहेत. त्यांचे कर्तृत्व खऱ्या अर्थाने व्यासंगी आहे. त्यांच्या नावाने असणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणे ही सन्मानाची बाब आहे. या सन्मानामुळे आपली जबाबदारी अधिक वाढली असून लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी येणाऱ्या काळात देशासाठी अधिक जोमाने काम करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
लोकमान्य टिळक व त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या, देशासाठी जीवन समर्पित करणाऱ्यांच्या कार्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेत आहेात. टिळकांनी स्वदेशी, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नासाठी प्रामाणिकपणे झटून कार्य करण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात प्रचंड पैसा आणि तंत्रज्ञान आहे. यासोबत देशाकरीता प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.
आज आपण ॲटोमोबाईल उद्योगांमध्ये जपानला मागे टाकून अमेरिका आणि चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहोत. येणाऱ्या काळात, शेती, पायाभूत सुविधा, उद्योग, संशोधन अशा सर्वच क्षेत्रात देशाला खूप संधी आहे. आपण प्रयत्नपूर्वक योगदान दिल्यास देशाला पहिल्या क्रमांकावर आणू शकतो. आपल्या देशात विश्वगुरु बनण्याची क्षमता आहे. हुशार युवाशक्ती आपल्याकडे आहे. सकारात्मक दृष्टीकोन आणि सकारात्मक राजकीय इच्छाशक्ती ठेऊन कार्य केल्यास आपण आपला देश जगात पहिल्या क्रमांकाची महासत्ता बनवू शकतो.
भारताला जगात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आणि लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी योगदान सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
देशाच्या विकासाबाबत बोलताना ते म्हणाले, 12 हजार कोटी खर्चाचे मोठे टनेल ब्रम्हपुत्रेमध्ये बांधण्यात येत आहे. सायकल रिक्षांच्या ऐवजी ई-कार, ई-बसेस बाजारात आणल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांकरीता 12 हजार कोटी रुपये दिले आहेत. डिसेंबरच्या आत महाराष्ट्रात 50 हजार कोटी रुपयांची कामे सुरू होतील. नवी मुंबई ते पुणे हायवेचे काम सुरू होत आहे. मुंबई ते बंगरूळू महामार्गचे काम हाती घेण्यात आले आहे. या नवीन मार्गामुळे पुणे ते मुंबई हा प्रवास दीड तासाचा होईल. पुणे परिसरात दोन लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. पुण्यात ३ नवीन पूल बांधण्यात येत आहेत. पुणे मेट्रो, विमानतळ कामाला गती देण्यात आली आहे. विकासाच्या कामात कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले.