पुणे समाचार : महाराष्ट्रातल्या मराठी मातीतले सच्चे आणि दिलदार नेते असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रत्येकाला अभिमान असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी याच पुण्यातून स्वराज्याचा मंत्र भारतीय जनतेला दिला. ब्रिटीशांनी ‘भारतीय असंतोषचे जनक’ म्हणून तर महात्मा गांधींनी ‘आधुनिक भारताचे जनक’ म्हणून संबोधले आहे. त्यांच्या नावाचा पुरस्कार गडकरी यांना मिळणे ही अभिमानाची बाब आहे. लोकमान्य टिळकांप्रमाणे केंद्रीय मंत्री गडकरी हे कार्यक्षमता आणि कार्यावर विश्वास ठेवणारे आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या नवभारताचे स्वप्न अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिल्पकारांपैकी गडकरी एक आहेत. त्यांचे कर्तृत्व पक्षभेद, समाज, धर्म, राजकारण याच्या पलिकडे जाणारे आहे, त्यांच्या कृतीतून याची प्रचिती येते.
युती सरकारच्या काळात गडकरींनी मुंबईत बांधलेल्या 55 उड्डाणपुलांमुळे मुंबईत आज वाहतूकीची समस्या कमी करण्यासाठी मोलाची मदत होत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, अनेक पोर्टची उभारणी, महामार्गांचे जाळे निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. ते रस्ते विकासाचे महामेरू आहेत. भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी गडकरींचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. राज्यात मोठे निर्माण कार्य करतांना त्यांचा आदर्श राज्यातील नेतृत्वासमोर असतो. ते आदर्श नेता, आदर्श मंत्री आणि आदर्श मित्र आहेत. आर्थिक आणि रचनात्मक शिस्त पाळून त्यांनी आपल्या कार्यातून लौकीक निर्माण केला आहे. जात, पंथ, भाषा विरहीत विचार असलेले आणि माणूस गुणांमुळे मोठा होता हे तत्वज्ञान त्यांनी कार्यातून मांडले. त्यांचे कार्य विकासनिती आणि विकासकामे ‘लोकमान्य’ झाल्याने त्यांना लोकमान्य टिळकांच्या नावाने मिळालेला पुरस्कार अधिक समर्पक ठरतो, असे त्यांनी सांगितले.