- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ना. श्री. नितीन गडकरी यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची ‘डॉक्टरेट’

■ कृषी क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी गौरव; शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नागपूर समाचार : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांना परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट (डी. एस्सी., डॉक्टर ऑफ सायन्स) प्रदान करण्यात आली. या डॉक्टरेटमुळे ना. श्री. गडकरी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

विद्यापीठाच्या वतीने आयोजित 26व्या दीक्षांत समारोहामध्ये काही अपरिहार्य कारणांमुळे ना. श्री. गडकरी यांना उपस्थित राहता आले नव्हते. त्यामुळे शनिवार, दि. १९ एप्रिलला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. इंद्र मणी यांनी ना. श्री. गडकरी यांच्या निवासस्थानी आयोजित अनौपचारिक सोहळ्यात ही डॉक्टरेट प्रदान केली.

जल संवर्धन, जैव इंधन विकास, जैविक आणि प्राकृतिक शेती, कृषि विविधीकरण आणि ग्रामीण विकासामध्ये ना. श्री. गडकरी यांच्या अमूल्य योगदानासाठी ही डॉक्टरेट प्रदान करण्यात येत असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

यापूर्वी देखील ना. श्री. गडकरी यांना महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आसाम राज्यातील विद्यापीठांनी डॉक्टरेटने गौरविले आहे. यामध्ये राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उत्तर प्रदेश येथील गलगोटियाज विद्यापीठ, गुवाहाटी येथील आसाम डाऊन टाऊन विद्यापीठ, गाझियाबाद येथील एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *