- Breaking News, धार्मिक , नागपुर समाचार

नागपूर समाचार : श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात हजारोंच्या संख्येत भक्तांचा सहभाग

श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक महापारायण भक्तांद्वारे २१११ पारायणाचा संकल्प रविवारी

नागपूर समाचार : श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समिती, नागपूरचे वतीने मागील १३ वर्षापासून दर महिन्यात श्री गजानन विजय ग्रंथाचे (मोठ्या पोथीचे) पारायण आयोजित करण्यात येते. तसेच वर्ष अखेर याची सांगता महापारायण सोहळ्याने करण्यात येते. शनिवार दि. 9 डिसेंबर रोजी, श्री गजानन महाराजांची पालखी सोहळा संपन्न झाला असून या पालखी सोहळ्यात सेवासदन ते अमृत भवन पर्यंत हजारोंच्या संख्येत भक्तांनी सहभाग घेतला होता. यावर्षीही रविवार १० डिसेंबर रोजी हा महापारायण सोहळा झांशी राणी चौकातील अमृत भवन येथे सकाळी ६ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून श्री विजय ग्रंथाचे २,१११ पारायण करण्याचा भक्तांचा संकल्प केला जाईल.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी हे उपस्थित राहणार असून श्री संत गजानन महाराज पारायण सेवा समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा श्री गजानन सेवा समर्पण गौरव पुरस्कार त्यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल. तसेच सकाळी ११ वाजता स्वाध्याय परीक्षेत यशस्वी झालेल्या गजानन भक्तांना पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल.

श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त कै.श्री रामचंद्र कृष्णाजी पाटील यांचे पणतू श्री शैलेंद्रजी महादेवरावजी पाटील शेगाव तसेच श्री गजानन महाराज ज्यांना प्रथमतः दिसले ते निस्सीम भक्त कै.श्री बंकटलाल अग्रवाल यांचे पणतू श्री शंकर लालजी अग्रवाल, शेगाव हे या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भव्य दिव्य अशा स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या सामूहिक महापारायणा करिता नागपूर शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील व लगतच्या राज्यातील काही शहरातील गजानन भक्त सहभागी होणार आहेत. या महापारायण सोहळ्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महापारायण सोहळ्यात सर्व गजानन भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन तसेच श्री विजय ग्रंथाचे पारायण रुपी पुष्प श्रींचे चरणी अर्पण करून वरील सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन महाराज पारायण सेवा समिती, नागपूरचे अध्यक्ष धनजीभाई चव्हाण, सचिव गजानन देशपांडे, संपर्कप्रमुख निखिल भुते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *