- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : भारताचे मह‍िला विषयक चिंतन प्रगत आणि परिपक्व – नयना सहस्रबुद्धे 

हाइलाइट…

  • नेत्री संमेलन उद्घाटन सत्र
  • नेत्री संमेलनाला नेतृत्‍वधारी मह‍िलांचा भरघोस प्रतिसाद 

नागपूर समाचार : वैदिक काळापासून महिलांना शस्त्र आणि शास्त्र अध्ययन, कला आणि कौशल्य याचे शिक्षण प्रशिक्षण देऊन त्यांना प्रगत आणि परिपक्व करण्याची संस्कृती आपल्याला भारतीय दर्शनात दिसून येते. ‘सर्वे सुखिनः संतु’ या तत्वावर आधारित भारतीय तत्वज्ञान स्त्रीला महत्वपूर्ण स्थान देते, असे मत भारतीय स्त्रीशक्तीच्‍या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि प्रमुख वक्ता म्हणून नयना सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या उद्बोधनात व्यक्त केले. 

समाजातील विविध क्षेत्रात सक्षमपणे कार्य करणा-या आणि देशाच्‍या विकासात महत्‍वाची भूमि‍का बजावणा-या महिलांचे नेत्री संमेलन महिला समन्वय आणि संघमित्रा सेवा प्रतिष्ठानच्‍यावतीने आज स्थानिक रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित करण्यात आले. त्यावेळी ‘भारताचे मह‍िला विषयक चिंतन’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर संमेलनाच्या उद्घाटक आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर,प्रमुख अतिथी म्‍हणून इस्रोच्या वैज्ञान‍िक डॉ. माधवी ठाकरे, समन्वयक अॅड. पद्मा चांदेकर, रुचिता जैन आणि श्रुती गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला 1600 पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती.

नयना सहस्रबुद्धे पुढे म्हणाल्या की, आज स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून बघितले जाते. परंतु, वैदिक काळापासून भारतात स्त्रीयांचे स्थान उन्नत राहिले आहे. भारतीय परंपरेत स्त्रीच्या गुणांचा गौरव करणे, तिला व्यक्‍ती म्‍हणून स्वतंत्र विचार असे आणि कुटुंबासह समाज आणि राष्ट्र विकासात स्त्रीच्या महत्वपूर्ण योगदानाचे दाखले आपल्याला आढळतात. अब्राह्मीक किंवा अन्य पाश्चात्य संस्कृतीपेक्षा भारतीय दर्शनात स्त्रीला महत्व असून तिला समान अधिकार देण्यावर भर राहिला आहे. त्यामुळे भारतीय चिंतन समजून घेऊन त्यानुसार वैचारिक परिवर्तन आणि तत्सम वाटचाल करण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

सुरुवातीला शिवशक्ती आखाडाच्‍या विद्यार्थिनींनी दांडपट्टा, लाठीकाठी आदींचे प्रात्यक्षिक सादर करून मह‍िलाशक्‍तीचे प्रदर्शन केले. त्यानंतर ‘ऐगिरी नंदिनी’, ‘अष्टभुजा नारायणी’ आदी गीतांवर नृत्य सादर करून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. यावेळी अर्चना देवतळे, उषा ठाकरे, वेदिका भारती यांच्या आईचा सत्कार करण्यात आला.

महिलांनी लावलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनीचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल आणि सह- पोलीस आयुक्त अश्वथी दोरजे यांनी केले. प्रास्ताविक पद्मा चांदेकर यांनी, सांघिक गीत मनिषा काशीकर यांनी सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी तर तर आभार प्रदर्शन रुचिता जैन यांनी केले. 

कार्यक्रमाला संस्कार भरतीच्या अध्यक्षा व नेत्री संमेलनाच्‍या पालक कांचन गडकरी, राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताई मेढे, उज्वला भारती, पुष्पा भारती, माजी न्या. मीराताई खड्डकार, अॅड. कुमकुम सिरपूरकर, मीरा कडबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्याची गरज: डॉ. माधवी ठाकरे

विज्ञान, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्याची आवश्यकता असल्‍याचे इस्रोच्‍या वैज्ञान‍िक डॉ. माधवी ठाकरे यांनी सांग‍ितले. अनेक मुली महिला विविध विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी नोंदणी करतात. परंतु जबाबदाऱ्यांमुळे त्या ते पूर्ण करू शकत नाही. महिला घर सांभाळून काम करतात. त्यामुळे पुरुषांच्‍या तुलनेत त्‍यांना आपली प्रतिभा वाढवावी लागेल, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

मुलांना स्‍त्रीचा सन्‍मान करण्‍यासाठी शिकवावे : डॉ. माधुरी कानिटकर

प्रत्येक स्त्रीने आपल्यासह किमान ५ स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या प्रगतीत सहकार्य करावे असा सल्ला देताना डॉ. माधुरी कान‍िटकर यांनी कुटुंब व्यवस्थेत मुलींना संस्कारित करताना मुलांनादेखील स्त्रियांचा सन्मान करण्‍यास शिकवावे. स्‍त्रीप्रति असलेली कर्तव्य त्‍यांना शिकविण्याची वेळ आली असून त्‍यातूनच सामाजिक समतोल राखता येईल असे त्या म्हणाल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *