- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपूर समाचार : दीनदयाल थाळीच्या पाच वर्षपूर्तिनिमित्त ‘कृतज्ञता’ सोहळा मंगळवारी

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार सायंकालीन भरड धान्य थाळीचे लोकार्पण

नागपूर समाचार : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील श्री सिद्धिविनायक मंदिरात सुखकर्ता दु:खहर्ता विनायकाकडून मांगल्याची प्रेरणा घेउन स्थापन झालेल्या श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनद्वारे गेली कित्येक वर्षे अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग असलेल्या मेडिकलमधील दीनदयाल थाली उपक्रमाच्या पाच वर्षपूर्तिच्या निमित्ताने मंगळवारी २५ एप्रिल रोजी कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मेडिकल कॉलेज परिसरात असलेल्या दीनदयाल थाळी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सायंकालीन भरड अन्न थाळीचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन नागपूर व दीनदयाळ थाळी संचालन समितीचे अध्यक्ष श्री संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मेडिकलमधील दीनदयाल थाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पराग सराफ, रितेश गावंडे, गजानन निशीतकर, बंडूभाउ राऊत, भवानजीभाई पटेल, आदित्य ठाकूर, सुनील काडगाये, राम अहिरवार आदी उपस्थित होते.

सायंकालीन भरड अन्न थाळीच्या लोकार्पण सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून दक्षिण नागपूरचे आमदार श्री. मोहनजी मते, जिल्हाधिकारी डॉ. विपीनजी इटनकर, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी., शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांची उपस्थिती असेल.  

दीनदयाल थाळी कृतज्ञता सोहळ्यात दिव्यांग मुलांना मान्यवरांच्या हस्ते ‘हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात येणार आहे. मेडिकलमध्ये केवळ नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भ, मध्यप्रदेश, तेलंगणा या भागातून देखील रुग्ण मोठ्या संख्येत येत असतात. असे लक्षात आले आहे की, आशियातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रुग्णांना अनेक समस्या असतात त्यामुळे त्यांना मदत करण्याकरिता कायमस्वरूपी दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्पाच्या मदत कक्षाचा शुभारंभ प.पू. सरसंघचालकांच्या हस्ते होणार आहे, असेही श्री. जोशी यांनी सांगितले. 

श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनद्वारे केवळ रुग्णसेवेसाठी समर्पीत दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प राबविला जातो. या उपक्रमांतर्गत ठिकठिकाणी निरनिराळ्या आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन केले जाते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून शिबिरात जनतेची आरोग्य तपासणी होते आणि गरजेप्रमाणे त्यांच्यावर योग्य उपचारही केले जातात. या उपक्रमांतर्गत आजवर तब्बल ३ हजाराहूनही अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या असून या रुग्णांना निरामय जीवन जगण्याची संधी प्राप्त झाली आहे. या व्यतिरिक्त फाऊंडेशनतर्फे रुग्णवाहिका, शववाहिकेचे व्यवस्थापन केले जाते. 

श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनचा दीनदयाल थाळी हा अनोखा उपक्रम नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात मेडिकलमध्ये चालविला जात आहे. या उपक्रमाद्वारे नागपूर मेडिकलमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना संस्थेतर्फे प्रत्येकी केवळ १० रुपयांमध्ये जेवणाची व्यवस्था केली जाते. नाममात्र शुल्कात चालविले जाणारे हे अन्नछत्र गेली साडेपाच वर्षे अखंडपणे सुरू आहे. लाखो गरजू लाभार्थी तृप्त अंत:करणाने संस्थेस आशीर्वाद देत आहेत. नागरिकांच्या आशीर्वादाने साडेपाच वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी २५ एप्रिल रोजी याच परिसरात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. 

संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीशी झुंजत असताना श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनने आपल्या सामाजिक बांधिलकीचा पुन:परिचय दिला. फाऊंडेशनच्या ‘सोबत’ या पालकत्व प्रकल्पांतर्गत कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी जीवांच्या अतिगरजू परिवारांचे पालकत्व स्वीकारले गेले. या परिवारांतील सदस्यांसाठी शिक्षण, समुपदेशन, आरोग्य, पोषक तत्वे, कौशल्य प्रशिक्षण या पाच आघाड्यांवर कार्यरत होऊन मायेचा आधार देण्याचे महत्वाचे कार्य फाऊंडेशन करीत आहे. आजवर जवळपास ३०० परिवारांना या अनोख्या प्रकल्पांतर्गत दिलासा मिळून सन्मानपूर्वक जगण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

‘स्पोर्ट्स कर्मा’ या आणखी एका अनोख्या उपक्रमात अनेक खेळाडूंना त्यांचे डायट, क्रीडा साहित्य अशा माध्यमातून मदत केली जाते. याशिवाय ट्रस्टतर्फे ‘व्होकल फॉर लोकल’, शेतकरी बाजार यासारखे नियमित उपक्रम राबवून आपले सामाजिक दायित्व निभावण्याचा प्रयत्न केला जातो. 

श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशनद्वारे प्रोफेसर राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत लहान मुलांमध्ये छोट्या छोट्या प्रयोगांमार्फत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण केला जातो. देशाच्या भावी पिढीत संस्कारक्षम वयातच योग्य तो वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगशीलता निर्माण करून आधुनिक भारत घडविण्याचे महत्कार्य केले जात आहे. 

मंगळवारी होणाऱ्या कृतज्ञता लोकार्पण सोहळ्यात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत केवळ सकाळी असलेली भरड धान्य दीनदयाल थाळी सायंकाळी देखील सुरू करण्यात येणार आहे. या सायंकालीन भरड धान्य दीनदयाल थाळीचा निश्चितच फायदा गरजू रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मिळेल, असा विश्वास देखील श्री संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

दीनदयाल थाली उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री पराग सराफ, रितेश गावंडे, गजानन निशीतकर, महेंद्र भुगावकर, देवेन दस्तुरे, बंडूभाउ राउत, भवानजीभाई पटेल, बंटी कुकडे, संदीप गवई, सौ. रश्मी फडणवीस, आदित्य ठाकूर, भूषण केसकर, सुनील काडगाये, सौ. मंजूषा भुरे, राम अहिरवार आदींचे सहकार्य लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *