- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : लालित्यपूर्ण काव्यानुभूती देणारे ‘शोध आरस्पानी’ – डॉ. विभावरी दाणी

डॉ. शुभदा खिरवडकर यांच्या पुस्‍तकाचे थाटात प्रकाशन

नागपूर समाचार : लहानपण समाधानी, आनंदी वातावरणात गेल्यामुळे भक्कम मानसिक बैठक, निरीक्षण, चांगुलपणा यातून आलेली सकारात्मकता ‘शोध आरस्पानी’ मध्ये दिसून येते. नाजूकपणा, सहजपणा, ओघवती भाषा असलेले डॉ. शुभदा खिरवडकर यांचे हे पुस्तक लालित्यपूर्ण काव्यानुभूती देणारे आहे, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या माजी अध‍िष्‍ठाता डॉ. विभावरी दाणी यांनी व्यक्त केले.

बालरोगतज्ज्ञ व लेखिका डॉ. शुभदा खिरवडकर यांच्‍या नितळ, पारदर्शी, व्यक्तिमत्वांचा आणि आरस्पानी निसर्ग-सौंदर्याचा वेध घेणाऱ्या लेखांचा संग्रह ‘शोध आरस्‍पानी’ चा प्रकाशन सोहळा शन‍िवारी पार पडला., 

चिटणवीस सेंटर येथे राजहंस प्रकाशनतर्फे आयोजित या कार्यक्रमाला डॉ. विभावरी दाणी यांच्यासह ज्‍येष्‍ठ पत्रकार शैलेश पांडे, ऑस्‍ट्रेलियाचे डॉ. प्रशांत जोशी, राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले यांची मंचावर उपस्‍थ‍िती होती. 

शास्त्रीय माहिती, संकलन, गोष्टीवेल्हाळ आणि कवित्वाने परिपूर्ण असे हे पुस्तक पद्यरूपातले गद्य आहे, असे डॉ दाणी म्हणाल्या. 

शैलेश पांडे म्हणाले, भाषेतले लालित्य आणि विचारांची संवेदनशीलता यांनी युक्त लेखन करणाऱ्या डॉ शुभदा याचे सारस्वतांच्या दालनात दमदार आगमन झाले आहे. ललित बंध हा अत्यंत कठीण प्रकार असून त्याकरिता तुमची अनुभूती विविध स्तरापालिकडे जावी लागते. लेखिकेने जागतिक संदर्भाला भावतालाची जोड देत हे ललित लेखन केले असून त्यात विषयांचे वैविध्य दिसते.

डॉ. प्रशांत जोशी म्हणाले, जागतिक स्तरावरील अनेक डॉक्टरांनी लिखाण केलेले आहे. पण डॉ शुभदा यांचे वैशिष्ट्य हे की त्यांचे साहित्य चिंतनातून उमटलेले आहे. संगीत, काव्य आणि विज्ञानाची कास न सोडता चिकित्सक पद्धतीने त्यांनी लिखाण केले आहे.

डॉ. शुभदा खिरवडकर यांनी मनोगत व्यक्त केले. लहानपणापासूनची असलेली वाचनची आवड, परदेशी जाताना प्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांनी त्याचा ग्रंथ खजिना आमच्याकडे सोपवल्यामुळेआणि ‘शब्दांशी मैत्री कर’ असे सांगणाऱ्या वडील यांच्यामुळे लिखाणाचे संस्कार झाले, असे त्या म्हणाल्या.  

कार्यक्रमाचे निवेदन रेणुका देशकर यांनी केले. त्यांनी पुस्तकातील ‘जनाई गं’ या लेखाचे प्रभावी अभिवाचन केले. त्याना अथर्व भालेराव यांनी व्हॉयोलिनवर उत्तम साथ दिली. नरेश सबजीवाले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *