- Breaking News

नागपूर समाचार : डॉ. रव‍िंद्र शोभणे हे जीवनवादी लेखक – भारत सासणे

लेखन चाळीशी निमित्‍त मित्र परिवारातर्फे हृद्द सत्‍कार

नागपूर समाचार : डॉ. रविंद्र शोभणे ज्‍या काळात लिहायला लागले त्‍यावेळी सौंदर्यवाद आणि वास्‍तववादाचे दोन नवे उपप्रवाह साहित्‍यात उभे राहायला लागले होते. काही मंडळी वास्‍तववाद तर काही सौंदर्यवादाकडे वळली पण डॉ. शोभणे यांनी हे दोन्‍ही सापळे झुगारत सर्वसामान्‍य माणसाला न्‍याय देण्‍याकरिता जीवनवादी लेखन केले, असे मत माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी व्‍यक्‍त केले.

मराठीतील विख्यात कथाकार, कादंबरीकार, समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे यांच्या लेखनाला चाळीस वर्षे पूर्ण होत असल्‍यानिमित्ताने त्‍यांचा मित्रपरिवारातर्फे शनिवारी भारत सासणे यांच्‍या हस्‍ते जाहीर सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी त्‍यांच्‍या पत्‍नी अरुणा शोभणे यांचाही सत्‍कार करण्‍यात आला. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झालेल्‍या या कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते तर प्रमुख अतिथी म्‍हणून माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांची उपस्‍थ‍िती होती. मंचावर डॉ. राजेंद्र सलालकर, उद्योजक रत्‍नाकर ठवकर, डॉ. रविंद्र शोभणे, डॉ.अजय कुलकर्णी, विदर्भ साह‍ित्‍य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांचीही उपस्‍थ‍िती होती. 

परिपक्‍वतेचा शोध घेण्‍याच्‍या डॉ. शोभणे यांच्‍या प्रवासात त्‍यांची चिंतनशीलताही डोकावते, असे सांगताना भारत सासणे यांनी त्‍यांच्‍यामध्‍ये श्रेष्‍ठ लेखक होण्‍याची क्षमता असल्‍याचे सांगितले. डॉ. शोभणे यांच्‍यामध्‍ये वैश्विक लिखानाची क्षमता असून त्‍यांच्‍यामध्‍ये करुणेचा अंत:प्रवाह दिसतो. डॉ. शोभण यांनी आता वैश्विक लिखाणाकडे वळावे, लिखाणाचा विस्‍तार करावा, अशी अपेक्षा भारत सासणे यांनी व्‍यक्‍त केली. 

प्रदीप दाते यांनी अध्‍यक्षीय भाषणातून डॉ. शोभणे यांना शुभेच्‍छा देताना त्‍यांच्‍या लेखन प्रवासाचे कौतूक केले. सामाजिक भान ठेवून त्‍यांनी लेखन केले आणि त्‍यांनी स्‍वत:ची भूमिका मांडली आहे. भविष्‍यातही ते समाजाला जे हवे ते देण्‍याचा प्रयत्‍न करतील, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. 

सत्‍काराला उत्‍तर देताना डॉ. रविंद्र शोभणे यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. त्‍यांच्‍यावर व त्‍यांच्‍या साहित्‍यावर प्रेम करणा-या सर्वांचे त्‍यांनी आभार मानले. 

मुख्‍य कार्यक्रमानंतर डॉ.रवींद्र शोभणे यांची डॉ. राजेंद्र सलालकर व अजय कुळकर्णी यांनी प्रकट मुलाखत घेतली. डॉ. वसुधा वैद्य यांनी प्रास्‍ताविक केले तर सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले. डॉ. संजय गोहणे यांनी आभार मानले. 

लहानपणापासून मोठा लेखक होण्‍याचे स्‍वप्‍न – डॉ. रविंद्र शोभणे

कलेचा वारसा मिळालेल्‍या डॉ. रविंद्र शोभणे यांनी शाळेत असताना नाटक, कविता लिहायला सुरुवात केली होती. ‘त्‍या वयातच मला राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे यांच्‍यासारखे मोठा लेखक होण्‍याचे स्‍वप्‍न होते आणि त्‍याकरिता काहीतरी केले पाहिजे, असे वाटत होते. त्‍यासाठी धडपड सुरू होती’, असे मत डॉ. रविंद्र शोभणे यांनी मुलाखतीदरम्‍यान व्‍यक्‍त केले. खरसुली येथे गायीच्‍या गोठ्यात केलेले नाटकाचा प्रयोग, चोरून वाचलेली पुस्‍तके, मुंबईतून नाटकाची पुस्‍तके विकत घेणे, पैसे देऊनन कविता छापून आणणे अशा खटाटोपांबद्दलचे किस्‍से सांगितले. 

नागपुरात आल्‍यानंतर लेखन प्रवासाला दिशा मिळाली असे सांगताना डॉ. शोभणे यांनी लेखन करण्‍यापूर्वी लेखकाने त्‍या विषयासंदर्भात भरपूर वाचन केले पाह‍िजे, असे सांगितले. ते म्‍हणाले, वाचनातून आपल्‍या प्रत्‍येक लेखकाची शैली तपासून, समजून घेता येते. त्‍यातून आपली शैली तयार होते. त्‍यामुळे पूर्वसुरींचा वाडमयीन इतिहास वाचून काढला पाहिजे’, असे त्‍यांनी सांग‍ितले. सबंध लेखन, वाचन प्रवासात माणसे वाचण्‍याचा प्रयत्‍न केला. अवतीभवतीचे प्रश्‍न डाचत होते, त्‍यांचा मागोवा घेत लिखाण केले, असे त्‍यांनी सांग‍ितले. डॉ.रवींद्र शोभणे यांनी डॉ. राजेंद्र सलालकर व अजय कुळकर्णी यांनी बोलते केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *