- नागपुर समाचार, मनपा

सर्व शहर बसमध्ये कॅमेरा लावण्यात यावे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांचे निर्देश : कामचुकार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे निर्देश

नागपूर, ता. १८ : नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या माध्यमातून संचालित करण्यात येणाऱ्या शहर बस वाहतुकीत महिलांसाठी सहा बसेस आहेत. त्यामध्ये कॅमेऱ्याची सोय आहे. मात्र, अन्य बसमधूनही अनेक घटनांसंदर्भातील तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे शहर बस सेवेत असलेल्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावे, असे निर्देश मनपा परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिले.

            नागपूर महानगरपालिका परिवहन समितीची बैठक बुधवारी (ता. १८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आभासी पद्धतीने पार पडली. सदर बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त रवींद्र भेलावे, समितीचे सदस्य नगरसेवक शेषराव गोतमारे, नरेश मानकर, रूपा रॉय, रूपाली ठाकूर, सोनाली कडू, विशाखा मोहोड, राजेश घोडपागे, उषा पॅलट, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, परिवहन विभागाचे रविन्द्र पागे, योगेश लुंगे सहभागी झाले होते.

            परिवहन सभापती बंटी कुकडे पुढे म्हणाले, शहर बस वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेला यापुढेही प्राधान्य देण्यात येईल. महिलांसाठी असलेल्या विशेष बसव्यतिरिक्त अन्य बसेसमध्येही महिला मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे या बसेसमध्येही महिला सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावणे अत्यावश्यक आहे. परिवहन समिती कक्षातून या सर्व बसेसवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात यावी, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. समिती सदस्या रुपा रॉय यांनी सुचविल्यानुसार बसेसमध्ये एका बाजूला संपूर्ण महिलांसाठी राखीव आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांसाठी राखीव असा प्रयोग करता येईल का, याची चाचपणी करण्याचे निर्देशही सभापतींनी दिले.

            शहर बस सेवेसाठी असलेल्या प्रत्येक डेपोची मोका तपासणी करून तेथे आवश्यक आणि गरजेच्या असलेल्या सर्व बाबींचा अहवाल तयार करून त्या तातडीने पूर्ण करा, पारडी येथील पास केंद्र त्वरित सुरू करा, असे निर्देशही सभापती बंटी कुकडे यांनी दिले. समिती सदस्य नितीन साठवणे यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने कामचुकार इंस्ट्रक्टरची हकालपट्टी करण्यात यावी व नव्याने नियुक्ती करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. मोरभवन बसस्थानकात अनेक प्रवासी बसच्या प्रतीक्षेत उभे असतात. त्यांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. तेथे प्रतीक्षालय अथवा खुर्च्यांची व्यवस्था करण्याचे निर्देशही सभापतींनी यावेळी दिली.

            मुंबई, इंदोर अशा मोठ्या शहरातील शहर बस व्यवस्थेमध्ये काय नव्या बाबी आहेत, लोकहितासाठी, प्रवाशांसाठी काही नवे प्रयोग राबविले जातात का, याचा अभ्यास करण्यासाठी समितीच्या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करावे, अशी सूचना सभापती बंटी कुकडे यांनी केली. बैठकीत अन्य १० प्रशासकीय विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या सर्व विषयांनाही समितीने मंजुरी प्रदान केली. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *