- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : प्रा. दीपश्री पाटील करणार स्‍वरचित 15 बंदिशींचा विक्रम 

शनिवार, 4 मार्च रोजी अभूतपूर्व सोहळा

नागपूर समाचार : सारस्‍वत संगीत विद्यालय व एकदंत क्रिएशन्‍स यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने प्रा. दीपश्री पाटील उपाख्‍य पी. दीपश्री यांनी यमन रागात निबद्ध केलेल्‍या स्‍वयंरचित 15 बंदिशींचा कीर्तीमान स्‍थापित करणार आहेत. शनिवार, 4 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता शिक्षक सहकारी बँक सभागृह, गांधीसागर तलावासमोर, महाल येथे त्‍यांच्‍या नावे ‘इंड‍िया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्‍ये विक्रम नोंदवला जाईल.

प्रा. दीपश्री पाटील या श्रीमती बिंझाणी मह‍िला महाविद्यालयामध्‍ये संगीत विभागात सहयोगी प्राध्‍यापक असून त्‍यांनी यमन रागातील 15 बंद‍िशींची रचना केली आहे. भारतीय शास्‍त्रीय संगीतातील तीनताल आणि एकतालात निबद्ध या बंद‍िशींपैकी 7 बंद‍िशींची रचना काव्‍यात्‍मक असून उर्वरित 8 बंद‍िशी तराणा स्‍वरूपात आहेत. ‘कल्‍चर अँड क्रिएटीव्‍हीटी’ या विभागात ‘मह‍िला प्राध्‍यापकाने यमन रागात रचलेल्‍या सर्वाधिक बंदिशी’ या शिर्षकांतर्गत त्‍यांच्‍या नावे हा विक्रम प्रस्‍थापित होणार आहे. या विक्रमांतर्गत प्रा. दीपश्री पाटील यांना 15 बंदिशी सादर करायच्या आहेत. 

प्रा. दीपश्री पाटील या संगीत विशारद असून गुरू पं. भैयाजी वझलवार व डॉ. निशा कुळकर्णी यांच्‍याकडून त्‍यांनी शास्‍त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. ‘नमो शारदे’, ‘यमन रंग’, ‘बंद‍िश’, ‘वतन हमारा है’ या सीडी तसेच, ‘गीत भास्‍कर’, ‘स्‍वरदीप’ ही दोन स्‍वरचित बंद‍िशींची पुस्‍तके प्रकाशित झालेली आहेत. ‘यमन रंग’, ‘दीपरंग’, ‘सावरो ग‍िरीधारी’, ‘मैफ‍िलीत दीपश्रीच्‍या’ अशा अनेक कार्यक्रमांची निर्मिती केली आहे.  

या अनोख्‍या उपक्रमाला मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍ित राहावे व प्रा. दीपश्री पाटील यांचा उत्‍साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *