- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : हृदयाचे ठोके हे संगीताच्या ठेक्या प्रमाणे – डॉ. प्रभाकर के. देशपांडे

हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर झाली संगीतमय चर्चा 

नागपूर समाचार : ताल, सुराचे तंत्र योग्य जुळले तर ज्याप्रमाणे गाणे गाण्याची मजा अनुभवाला येते त्याचप्रमाणे योग्य जीवनशैली, व्यायाम, वजन नियंत्रण हे शरीराचे तंत्र योग्यरित्या सांभाळले गेले तर हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतात आणि आयुष्याची मजा अनुभवता येते, असे उदाहरण देत डॉ. प्रभाकर के. देशपांडे यांनी हृदयाचे ठोके हे संगीताच्या ठेक्याप्रमाणे असल्याचे प्रतिपादन केले.

श्रीमती कमलाबाई देशपांडे मेमोरियल ट्रस्ट, नागपूर यांच्या सौजन्याने ऋतुराज प्रस्तुत हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर संगीतमय चर्चेचा कार्यक्रम ‘गुंतता… हृदय हे! चे आयोजन आज दि सायंटिफिक सोसायटी सभागृह, आठ रस्ता चौक, लक्ष्मी नगर, नागपुर येथे करण्यात आले. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रभाकर के. देशपांडे, एम. डी. मेडीसिन हृदयविकाराच्या गुंतागुंतीवर चर्चेत सहभागी झाले. 

लहान मुलांमधील वाढत्या हृदयविकारांवर बोलताना त्यांनी परदेशातील एका अभ्यासाचा दाखला दिला. पाश्चात्य जीवनशैलीमुळे लहानपणापासून लठ्ठपणा, हार्ट ब्लॉकेज यासारखे विकार दिसून येत आहेत. हे प्रमाण भारतात देखील वाढत आहे. हे टाळायचे असेल तर रोजच्या दैनंदिनी मध्ये नियमितता आणावी लागेल, असे म्हणाले. इतर ह्र्दय संबधी आजार जसे जन्मतः हृदयात छिद्र असणे, ऱ्हुमॅटिक हार्ट डिसीज, कार्डियोमायोपॅथी, रक्तवाहिन्यांचे आजार इत्यादींवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. सध्याच्या काळात प्रेग्नन्सी किट असतात. परंतु आधीच्या काळी हे उपलब्ध नव्हते. पाळी येण्यासाठी महिला कॉन्ट्रासेप्टव्ह गोळ्या घ्यायच्या त्याचा हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे जन्मतः बाळाच्या हृदयाला छिद्र असण्याची अनेक प्रकरणे दॆसून येतात. हे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे असे ते म्हणाले. 

यावेळी गुणवंत घटवाई, मंजिरी वैद्य-अय्यर, मुकुल पांडे या गायक मंडळीने कार्यक्रमाच्या संकल्पनेनुरूप ‘ हृदय आणि दिल ‘ शीर्षकाची अनेक जुनी नवीन गीते सादर केलीत. यात हृदयाच्या तालावर नाचे गणेशु, दिल है छोटासा, दिल चीज क्या है, गुंतता हृदय हे, दिल की आवाज सून, है अपना दिल, रुक जा रात ठहर, लावा भांड्याला कल्हई’ अश्या हिंदी मराठी गीतांचा समावेश होता. त्यांना परिमल जोशी, मोरेश्वर दहासहस्त्र, पंकज यादव, विशाल दहासहस्त्र, मुग्धा तापस यांनी उत्तम साथ संगत कलेची .या कार्यक्रमाची संकल्पना मुग्धा तापस यांची होती तर कार्यक्रमाचे निवेदन किशोर गलांडे करतील. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *