- Breaking News, नागपुर समाचार

हिंगणघाट समाचार : अवैध धंदे व रेती तस्करी रोखण्यासाठी भाजयुमोचा एल्गार…

गरिबांच्या भूखंडाचे श्रीखंड लाटणाऱ्या राकाँ नेत्यांच्या बारामतीच्या चौकशीची केली युवा मोर्चाने निवेदनातून प्रशासनाकडे मागणी

हिंगणघाट समाचार : मागील काही काळापासून शहरात व हिंगणघाट महसूल उपविभागात अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे. नियमबाह्य भुखंड विक्री सारखे व्यवसाय फोफावल्याचे दिसून येत असून यात राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आशीर्वादाने व स्थानिक नेत्यांच्या सूचनेवरून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करीत भाजयुमो या विरोधी एल्गार पुकारला. 

काल दि.६ रोजी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले तसेच परिविक्षाधीन आयपीएस पोलिस अधिकारी श्रीमती वृष्टी जैन यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. या संबंधात तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारासुद्धा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. 

अवैध भूखंड व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची माया जमविण्याच्या हेतूने सामान्य व कष्टकरी जनतेच्या विश्वासाला छेद देऊन एन.ए.टी.पी मंजूर नसलेल्या व ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण होते अशा बारामती ले-आऊट, महाकाली नगरी व हिंगणघाट नदी लगतच्या परिसरातील अनेक लेआऊट मध्ये शहरात ३ वर्षापुर्वी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तत्कालीन निर्माणाधीन असलेल्या बारामती नगरीत मोठ्या प्रमाणात पुढील १ ते २ महिन्यापर्यंत पाणी साचले असल्याने तेथील प्लॉट धारकांच्या मनांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले, त्यांनी लेआऊट मालकाकडे भुखंड परत घेण्याची विनंती केली असता त्या गरीब कष्टकरी जनतेला त्या बारामतीचा आशीर्वाद घेऊन आपली राजकीय पोळी शेकणाऱ्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी सदर प्लॉट धारकांना जीवे मारण्याची धमकी दिली तसेच जमा केलेली रक्कम परत पाहिजे असल्यास दिलेल्या रकमेतून ४०% पैसे कपात करु व उर्वरित ६०% रोख रक्कम परत मिळेल असे धमकावल्याने रोजमजुरी करून व राब-राब कष्ट करून उभ्या केलेल्या पैश्यावर पाणी फेरले या विवंचनेत त्यांनी आपले भुखंड तसेच ठेवले व भविष्यात निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल जीव मुठीत घेऊन गप्प राहिले.

उपरोक्त भुखंडधारकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही मुंबईतील नेत्यांच्या व बारामतीच्या नेत्याच्या आशीर्वादाने स्वतःला समाजसेवक म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषीत तथाकथित नेत्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून व मुंबईतील नेत्यांचा धाक दाखवून रेड झोनमध्ये असलेल्या जमिनीवरती अवैधरित्या लेआऊट निर्माण करून भविष्यात सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने खोटेनाटे आश्वासन देऊन व लेआऊट निर्मितीसाठी लागणाऱ्या नियमांची अंमलबजावणी न करता जमिनी विकण्याचा गोरखधंदा हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात सुरुच ठेवला आहे.

याचं धर्तीवरती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहरात तसेच ग्रामीण भागात अवैध रेती तस्करीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना हाताशी धरून वणा नदीच्या पात्रात असलेल्या समुद्रपूर तालुक्यातील व मांडगाव-हिंगणघाट तालुक्यातील दारोडा, शेकापूर, सावंगी, साती, कात्री घाटातून जेसीबी व पोकलेनच्या माध्यमातून वाळूचा अवैध उपसा करून टिप्पर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात राजरोसपणे वाहतूक करून विक्री केल्या जात असल्याचे सुद्धा निदर्शनास येत आहे, असे असूनसुद्धा मुंबईतील वरिष्ठ नेत्यांच्या दबावाने हिंगणघाट शहरातील महसूल प्रशासन काहीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. सदर अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कुठल्याही मुंबईतील तसेच राज्यातील वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडता येत्या ५ दिवसांच्या आत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सोनू पांडे, शहर महामंत्री तुषार हवाइकर, महामंत्री तुषार येनोरकर, भुषण आष्टणकर, शहर उपाध्यक्ष मयूर येसनसुरे,स्वप्नील सुरकार, आशिष खिळेकर, ओम भोमले, सुरज काटकर, शंकर मोरे, रोहित हांडे, युवराज माउसकर, रितीक दांडेकर, बाबू रमिझ, नितीन नांद, सचिन मोरे, कुणाल रघाटाटे, योगेश जिकार,भूषण देहाडराय, सागर शेंडे, दिनेश खियानी, अमित कामडी, तेजस मुन, गणेश मस्के, हर्षद गिरडकर, सुजल नारनवरे, अनिकेत डबले, साहिल शेंडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *