- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समारंभ संपन्न; स्व. दिनकर रायकर यांना जीवन गौरव पुरस्कार

हाइलाइट….

  • विविध विषयांवर काम करणाऱ्या इतर ८ मान्यवरांना विशेष पत्रकारिता पुरस्कार.
  • ‘पद्मश्री’ परशुरामजी खुणे यांचा विशेष गौरव सन्मान.
  • डॉ. आशिषराव र. देशमुख यांचा स्तुत्य उपक्रम.

नागपूर समाचार : “पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच मिडिया व पत्रकारितेला अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले, त्यामुळे पत्रकारांना जॉब सिक्युरिटी मिळाली. परंतु, त्यानंतर जवळपास ३००० पत्रकारांना त्यांच्या कामावरून कमी करण्यात आले तेव्हा सरकारने काहीच केले नाही. मिडीयानेसुद्धा याबाबतीत काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आज पत्रकार आणि पत्रकारितेची भाषा वेगळी झाली आहे. ग्रामीण भागाकडे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. ग्रामीण भागात ६९% लोकसंख्या आहे. त्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न कोण उचलणार?, हा मोठा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील बातम्यांना पहिल्या पानावर ०.६७% जागा मिळते, हा ग्रामीण भागावर अन्याय आहे. गुन्हेगारी आणि मनोरंजनाला जास्त जागा मिळते. महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी पहिल्या नंबरवर येतो, ही मोठी शोकांतिका आहे. फॅशनच्या शो ला ५०० पत्रकार जाऊन कव्हरेज देतात, बॉलीवूडला कव्हरेज देतात, परंतु शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा किती कव्हरेज मिळते? कृषी संकटामुळे ग्रामीण भागातून शेतकरी नाईलाजास्तव शहरात आला.

देशाच्या स्वातंत्र्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. १५ वर्षांपूर्वी असलेले शेतकऱ्यांचे संकट आज समाजाचे संकट झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा खरा आकडा कधीच मिळत नाही. कोणत्याही मोठ्या चॅनेल वा वर्तमानपत्राने कोविडमध्ये मृत्यू पावलेल्यांचा खरा आकडा सांगितला आहे का? मिडिया दडपणाखाली काम करत आहे. आजच्या मीडियात सत्य लिहिण्याची ताकद नाही, ही खंत आहे. सत्यासाठी प्रवाहाच्या विरोधातदेखील लिहिण्याची ताकद पत्रकारांनी बाळगावी”, असे प्रतिपादन पत्रकारितेतील राष्ट्रीय स्तरावरील नामवंत ज्येष्ठ पत्रकार श्री. पी.साईनाथ यांनी केले. महाराष्ट्र स्तरावरील ‘अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान समारंभात ते बोलत होते. अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने २०२०-२१ वर्षासाठी पुरस्कार प्रदान समारंभ दि. ०३ फेब्रुवारीला वनामती सभागृह, व्हीआयपी रोड, धरमपेठ, नागपूर येथे संपन्न झाला. १९९९ पासून दरवर्षी अरविंदबाबू देशमुख स्मृती प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

यावर्षीसुद्धा ज्युरींच्या निवड समितीकडून निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडियात कार्यरत पत्रकारितेतील नामवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ‘जीवन गौरव पुरस्कार’ हा २०२०-२१ साठी स्व. दिनकर केशव रायकर (तत्कालीन सल्लागार संपादक, लोकमत, मुंबई) यांना जाहीर करण्यात आलेला पुरस्कार त्यांच्या वतीने श्री. शैलेश पांडे यांनी स्वीकारला. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये, मानचिन्ह, आणि मानपत्र असे आहे. इतर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना विशेष पत्रकारिता पुरस्कारांतर्गत रोख राशी, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. मुद्रित माध्यमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी श्री. संजय आवटे (औरंगाबाद), इलेक्ट्रॉनिक माध्यमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी श्री. निलेश खरे (मुंबई), उत्कृष्ट शोधपत्रिकेसाठी श्री. विश्वास वाघमोडे (मुंबई), सर्वोत्कृष्ट कृषी पत्रकारितेसाठी डॉ. राधेश्याम जाधव (पुणे), उत्कृष्ट ई-मिडियासाठी श्री. तुषार खरात (मुंबई), सर्वोत्कृष्ट सामाजिक पत्रकारितेसाठी श्री. देवेंद्र गावंडे (नागपूर), सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून सौ. मेघना ढोके (नाशिक), सर्वोत्कृष्ट कोरोना आरोग्यविषयक वृत्तांकनासाठी श्री. महेंद्रकुमार महाजन (नाशिक) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गडचिरोली जिल्ह्यातील गुरनोली येथील रहिवासी ‘पद्मश्री’ परशुरामजी खुणे यांचा विशेष गौरव सन्मान यावेळी करण्यात आला. गेल्या ५० वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीवर वावरतांना पाच हजारांवर नाट्यप्रयोगांमध्ये भूमिका वठविणारे ज्येष्ठ नाट्य कलावंत म्हणून त्यांनी भरीव कार्य केले आहे. झाडीपट्टी कलावंत असल्याचा आपल्याला अभिमान असून झाडीपट्टीच्या रसिकांना ‘पद्मश्री’ अर्पण करतो, असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले. 

हा पुरस्कार समारंभ पत्रकारितेतील राष्ट्रीय स्तरावरील नामवंत ज्येष्ठ पत्रकार श्री. पी.साईनाथ यांच्या शुभहस्ते आणि श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख हे अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, “अनेक मान्यवरांना या व्यासपीठावरून सन्मानित करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य समजतो. पत्रसृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. पत्रकारांना त्यांच्या ज्ञानाच्या, कष्टाच्या, अनुभवाच्या आणि ध्येयवादाच्या तुलनेत जो मोबदला मिळतो, तो पुरेसा नाही. पत्रकार हे शासनाचे कर्मचारी नसले तरी लोकशाहीच्या इतर तीन स्तंभांएवढीच मोलाची भूमिका ते करीत असतात.

पत्रकारांना शासनाने योग्य वेतन व अन्य प्रकारचे संरक्षण आणि समाजाने पाठबळ दिले पाहिजे. समाजाने प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. यात आम्ही खारीचा वाटा उचलतो. उत्तम पत्रकारांना सन्मानित केले पाहिजे, या भावनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सुरुवातीला विदर्भाच्या स्तरावर, नंतर महाराष्ट्राच्या स्तरावर आणि आता देशाच्या स्तरावर या पुरस्काराची ओळख निर्माण झाली आहे.

आम्ही अर्ज मागवत नाही हे वैशिष्ट्य. निवड मंडळात महाराष्ट्रातील नामवंत ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते निवड करतात. पत्रकारिता हे व्रत असते. पत्रकारांच्या व्रतस्थेमुळे लोकशाही टिकली आहे. उत्तम आणि निर्भय पत्रकार हा लोकशाहीचा संरक्षक असतो आणि या अर्थाने तो सामान्यांचा संरक्षक असतो. त्यांच्यासाठी काही तरी करण्याच्या भावनेतून हा सन्मान. आमचे प्रयत्न पुरेसे नाहीत, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, फूल ना फुलाची पाकळी या भावनेतून आम्ही सन्मानपूर्वक पुरस्कार देतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळावा म्हणून आपण मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार.” कार्यक्रमाला सौ. रूपाताई देशमुख, डॉ. आयुश्री देशमुख, पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे नातेवाईक, पत्रकार बंधू-भगिनी आणि मोठ्यासंख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *