खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन; प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांची अनुभव संपन्न मुलाखत
नागपूर समाचार : कुठलेही कार्य सिद्धीला नेण्यासाठी त्यासाठी घेण्यात आलेले कष्ट आणि त्या प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा महत्वाचा असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी व्यक्त केले. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती व ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या संयुक्तवतीने केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे 3 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान कविवर्ष सुरेश भट सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी वंदना गुप्ते बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, माजी महापौर कुंदाताई विजयकर, अनिल सोले, कृषितज्ञ सी डी मायी, माजी नगरसेवक राजाभाऊ लोखंडे, जयप्रकाश गुप्ता, अशोक मानकर, प्रभाकर येवले यांची प्रमुख उपस्थिती केली.
गुप्ते यांनी ‘हरविलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकातील एक परिछेद सादर करून प्रक्रियेचे महत्व विशद केले. यावेळी खासदार महोत्सव समितीने या आयोजनांसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नानाचे कौतुक त्यांनी केले. विदर्भाच्या जनतेसाठी खासदार नितीन गडकरी यांनी आत्मियतेने नियमितपणे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केले. या शिवाय वंदना गुप्ते यांनी घन निळा लाडीवाळा’ हे गीत श्रोत्यांच्या मागणीला मान देऊन सादर केला. ‘नागपूर शहर अत्यंत सुंदर’ असल्याचा उल्लेख वंदना गुप्ते यांनी यावेळी केला. इथे येऊन राहायला आवडेल असे देखील त्यांनी सांगितले. तसेच पुढील वर्षीच्या आयोजनात आपण नक्की नाटकाचं प्रयोग करू असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
यांनंतर राजदत्त यांची प्रकट मुलाखत अजय गांपावार यांनी घेतली. संवेदनशील लेखक ते लोकप्रिय दिग्दर्शक असा प्रवास त्यांनी उलगडला. या दरम्यान मंजिरी अय्यर, गुणवंत घटवई आणि गायक मंडळीने राजदत्त यांच्या चित्रपटामधील अजरामर गाणी गायली. यात बीज अंकुरे, मधू इथे अन चंद्र तिथे, गंध फुलांचा गेला सांगून या गीतांचा समावेश होता.
तत्पूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातले वैफल्य दूर व्हावे आणि त्यांना काही काळ निशुल्क आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवता यावे यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती माजी खासदार दत्ता मेघे यांनी सुरवातीला मनोगत व्यक्त करताना दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी केले. विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
‘घरची राणी’ चित्रपटाला पुरस्कार मिळणे अनपेक्षित पण सुखावणारे – राजदत्त
वेगळ्या धाटणीचे चित्रपट करणारे राजदत्त यांनी कौटुंबिक चित्रपट केल्याचा अनुभव सांगताना संगीतले की त्यांच्या गुरुस्थानी असलेल्या भालजी आणि राजा परांजपे यांचे चित्रपट स्पर्धेत असताना आपल्या चित्रपटाला पुरस्कार मिळणे हे अनपेक्षित पण सुखावणारे होते. यापूर्वी कौटुंबिक पार्श्वभूमीचे चित्रपट आपण केले नसल्याने तो एक वेगळा अनुभव होता असे ते म्हणाले. या आणि अश्या अनेक चित्रपटांच्या आठवणी उजाळतान राजदत्त रमले.
याशिवाय बालपणी कोळसा खाण भेट आणि त्यावर लिहलेले निबंध. त्यात त्यांनी वयाच्या मनाने दाखविलेले प्रगल्भ विचार आणि संवेदनशील लेखकाचे गुण. दैनिक तरुण भारत चे संपादक ग त्र्य माडखोलकर यांचे मार्गदर्शन या विषयी देखील त्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या. मूळ वर्धा जिल्हा धमाणगावचे 91 वर्षीय राजदत्त यांनी ‘चांदोबा’ साठी लिहण्याचा अनुभव, बी नागी रेड्डी यांच्या कडील सिनिमाचे धडे, सिनेमा दिग्दर्शित करण्याचे अनुभव सांगून श्रोत्यांना प्रत्येकवेळी दाद द्यायला भाग पाडले.