- Breaking News, नागपुर समाचार

नागपुर समाचार : भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या भजन संध्येत श्रोते तल्लीन

‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’चे उद्घाटन

नागपूर समाचार : ‘ऐसी लागी लगन…मीरा हो गयी मगन…’ हे सूर लक्ष्मीनगरच्या मैदानात घुमले आणि उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत पद्मश्री भजन सम्राट अनुप यांचे स्वागत केले. श्री. सिद्धिविनायक ट्रस्ट झिल्पीद्वारे आयोजित मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’च्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता.6) श्री. अनुप जलोटा यांच्या भजन संध्येत श्रोते तल्लीन झाले.

तत्पूर्वी माहिती आयुक्त श्री. राहुल पांडे यांच्या हस्ते एक्स्पोचे उदघाटन झाले. यावेळी माजी महापौर श्री. सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. संदीप जोशी, सचिव श्री. पराग सराफ, रितेश गावंडे, गजानन निशितकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी पद्मश्री अनुप जलोटा व त्यांच्या सहकारी कलावंतांचे आणि उपस्थित मान्यवरांचे श्री. संदीप जोशी यांनी पुष्पगुच्छ आणि श्री. सिद्धिविनायकाची मूर्ती देऊन स्वागत केले. आमदार श्री. प्रवीण दटके यांनीही भजन संध्येला उपस्थिती दर्शविली व एक्स्पो ची पाहणी केली.

‘अच्युतम केशवम…’, ‘मेरे मन में हैं राम, तन में हैं राम..’ अशा एकाहून एक अनेक सरस भजनांसह जगजीत सिंग यांच्या ‘तुम इतना जो इतना मुस्कुरा रहे हो…’, ‘होठो से छू लो तुम..’ अशा अनेक गज़ल त्यांनी गायल्या. विशेष म्हणजे श्री. अनुप जलोटा यांच्यासोबत उपस्थित श्रोत्यांनीही या गज़ल गुणगुणत दाद दिली. भजन, गज़ल यापाठोपाठच ‘दमादम मस्त कलंदर…’ गीताचे सूर छेडताच श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे तालात टाळ्यांची साथ दिली. 

नागपूर शहरात स्थानिक स्तरावर येथील महिला, तरुण यांच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळावे, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावे, या हेतूने आयोजित ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’मध्ये स्थानिक महिला, तरुणांनी लावलेले ‘फॅशन अँड लाईफस्टाईल’, ज्वेलरी, हस्तकला आणि हस्त निर्मिती दागिने, सर्व प्रकारची सेंद्रीय उत्पादने, नर्सरी अँड ॲग्रो, स्कील डेव्हलपमेंट अँड ट्यूटोरियल, टूर्स अँड ट्रॅव्हल्स/रिअल इस्टेट, बँकींग अँड म्यूचल फंड, अन्नपदार्थ अनेक विविध स्टॉल्सवर नागरिकांनी गर्दी दिसून येत होती. एक्स्पो ला भेट देणाऱ्यांसाठी दररोज लकी ड्रॉ काढण्यात येत असून विजेते आकर्षक बक्षीसे जिंकत आहेत.

तीन दिवसीय ‘व्होकल फॉर लोकल एक्स्पो’मध्ये शनिवारी 7 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ‘हिच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे..’ फेक सुप्रसिद्ध गायक श्री. अजित परब यांची भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. तर रविवारी 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता ख्यातनाम शेफ विक्रमवीर श्री. विष्णू मनोहर यांच्या कुकरी शो चे आयोजन आहे. तीनही दिवस एक्स्पो दुपारी 12 ते रात्री 10 वाजता पर्यंत नियमित सुरू आहे.

एक्स्पोच्या आयोजनासाठी ज्योत्स्ना कुऱ्हेकर, पद्मश्री देशपांडे, पराग जोशी, अमी पटेल, वैशाली देव, वृषाली दारव्हेकर, अमित होशिंग, पूजा गुप्ता, निरज दोंतुलवार आदी सहकार्य करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *