- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : श्री सद्गुरुदास महाराजांना “धर्मभास्कर”सन्मान प्रदान सोहळा; बुधवार दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी आयोजन

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, संकेश्वर पीठाचे पूज्यपाद शंकराचार्य इत्‍यादी महानुभावांची उपस्थिती; दिनांक १० जानेवारीला सायंकाळी भव्य रथयात्रा

नागपुर समाचार : संकेश्वर पीठाचे जगद्गुरु पूज्यपाद शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती यांनी श्री सद्गुरुदास महाराज यांना ‘धर्मभास्कर’ हा सन्मान प्रदान केला असून हा भावपूर्ण सोहळा नागपूरला दि १० जानेवारी व ११ जानेवारी २०२३ रोजी भव्य प्रमाणात संपन्न होत आहे. संकेश्वर पीठ हे १२०० वर्षांची परंपरा लाभलेले पीठ असून याच पीठाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांनी सरनौबत नेताजी पालकरांचे शुद्धिकरण करवून घेतले होते. गेल्या शतकात संकेश्वर पीठाने बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य’ पदवी बहाल केली होती. श्री नारायणराव राजहंस यांना ‘बालगंधर्व’, श्री भीमसेन जोशी यांना ‘स्वरभास्कर’, स्व.लता मंगेशकर यांना ‘स्वरभारती’ या पदव्यांनी विभूषित केले होते. याच परंपरेत आता श्री सद्गुरुदास महाराज यांना ‘धर्मभास्कर’ सन्मानाने गौरविले जात आहे.

रा.स्व. संघाचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या अध्यक्षतेखाली संकेश्वर पीठाचे पूज्यपाद शंकराचार्य ,कंपाली पीठाचे आचार्य नारायण विद्याभारती, बीडचे ह .भ .प. अमृताश्रमस्वामी, प्रज्ञाचक्षु श्री मुकुंद काका जाटदेवळेकर, काशीचे वे. शा. संपन्न श्री गणेश्वर शास्त्री द्राविड, डॉ. म. रा. जोशी, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. मधुसुदन पेन्ना यांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान सोहळा दिनांक ११ जानेवारी २३ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता सुरेश भट सभागृह परिसरात संपन्न होईल. यावेळी अनेक संत महंत योगी, वे.शा.संपन्न महानुभाव तसेच ठीकठिकाणाहून आलेले हजारो उपासक उपस्थित राहतील. 

तत्पूर्वी, मंगळवार दिनांक १० जानेवारीला पूज्यपाद श्री शंकराचार्य व सर्व संत महंत ,आचार्य यांच्या स्वागतार्थ सायंकाळी ६ वाजता रेशीमबाग येथील व्हीनस स्पोर्ट्स असोसिएशन मैदाना वरून भव्य रथयात्रा रेशीमबाग परिसरात काढली जाईल.

संतांचे ५ रथ ,लाखनी – तेल्हारा येथील विद्यार्थ्यांची लेझीम पथके, घोडेस्वार ,पुणे येथील ढोल-ताशा पथक, शंखनाद पथक, शिवकालीन मर्दानी खेळांचे पथक, गुजरात मधील दांडिया पथक, टाळ दिंड्यासह हजारो उपासक ही रथयात्रेची आकर्षणे असतील. रथयात्रेत संकेश्वर पीठाचे पूज्यपाद शंकराचार्य,कर्नाटकामधील कंपाली पीठाचे आचार्य श्री नारायणविद्या भारती,बीडचे श्री अमृताश्रम महाराज,प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर (पाथर्डी,अहमदनगर), श्री बाबामहाराज तराणेकर (इंदौर), ह.भ.प.श्री गोविंद महाराज (पाथर्डी), श्री दत्तगिरी महाराज (मरडसगाव ),योगश्री कालिदास महाराज (गुंज,परभणी) श्री बब्रू महाराज (तेलंगणा), श्री अवधूत गिरी महाराज(उत्तरप्रदेश), श्री नागेशशास्त्री अंबुलगे नंदी महाराज(तुळजापूर),ह.भ.प.भागवत महाराज(लखनौ), श्रध्देय राधिकानंद सरस्वती(पुणे), श्री राहुल फाटे(नाशिक), श्री छोटे बालकदास माहात्यागी महाराज (धर्मापुरी-वय१००वर्षे), हिमालय योगी श्री सदानंदगिरी महाराज (वय १०७वर्षें), श्री भगिरथी महाराज (नागपूर) व श्री सद्गुदास महाराज इत्यादी संत मंडळी राहतील.

बुधवार दि. ११ जानेवारीला रेशीमबागेतील महर्षी व्यास सभागृहात सकाळी ८.३० वाजता श्री गुरुमंदिर परिवाराची सीडी दाखविली जाईल. सकाळी ११ ते १ या काळात डॉ. म.रा. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रभेट प्रकाशनतर्फे ‘धर्मभास्कर’ गौरविकेचे प्रकाशन केले जाईल. सुमारे २०० पृष्ठांची ही गौरविका दिनांक ११ रोजी सायंकाळी ‘धर्मभास्कर’ सन्मान प्रदान सोहळ्यानंतर सर्व उपस्थितांना सप्रेम भेट म्हणून दिली जाईल. या द्विदिवसीय भावपूर्ण सोहळ्यात सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी अगत्यपूर्वक उपस्थित रहावे, अशी विनंती आंतरराष्ट्रीय श्री गुरुमंदिर परिवार संयोजन समितीने केली आहे.

पत्रकार परिषदेला आंतरराष्‍ट्रीय संयोजन समिती प्रमुख अजेय देशमुख यांनी संबोधित केले. संजय बाराहाते, संजीवनी अगस्ती यांची यावेळी उपस्‍थ‍िती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *