- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात होणार ग्रंथोत्सव; जिल्हाधिकारी डॉ.‍ विपीन इटनकर यांनी सांगितले

ग्रंथरसिकांना विविध कार्यक्रमाची पर्वणी

नागपूर समाचार : नागरिकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जिल्हयात ग्रंथोत्सवाचे आयोजन ‍डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात होणार असल्याने ग्रंथरसिकांना विविध कार्यक्रमाची पर्वणी मिळणार आहे. ग्रंथोत्सवात कवी संमेलनासोबत परिसवांदाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.‍ विपीन इटनकर यांनी सांगितले.

ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीच्या वतीने ग्रंथोत्सव आयोजनाची पूर्व बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागहात आयोजित करण्यात आली. या बैठकीस शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर,जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, जिल्हा ग्रंथपाल ग.‌ मा. कुरवाडे तसेच विविध प्रकाशनाचे प्रकाशक यावेळी उपस्थित होते. 

जास्तीत जास्त नागरिकांना या ग्रंथोत्सवाचा लाभ घेता यावा, त्यासोबतच मोठ्या प्रमाणात ग्रंथ विक्री होण्यासाठी फुटाळा येथे कवी संमेलनाचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

त्यासोबतच प्रकाशक व ग्रंथविक्रेते यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ जवळील दिक्षांत सभागृहात ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने त्यासोबत शांताबाई शेळके, अण्णाभाऊ साठे, वसंत बापट, जी.ए. कुलकर्णी, कवी शंकर रमाणी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रंथोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करुन घेण्याचे त्यांनी सांगितले.

ग्रंथोत्सव दोन दिवस राहणार असून यात ग्रंथदिंडी, परिसंवाद, मनोरंजनपर कार्यक्रम,‍ कवी संमेलन, स्पर्धा परिक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा ग्रंथपाल श्री. कुरवाडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *