- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : तंत्रशास्त्र विद्यापीठामुळे टेक्नालॉजी क्षेत्रात भविष्य घडविणे सुलभ : उदय सामंत

जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी कटिबध्द, विभागीय केंद्राचे उद्घाटन

नागपूर समाचार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना कोकणात जाण्यास फार अडचण येत असल्यामुळेच नागपूर येथे विभागीय केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांना टेक्नालॉजी क्षेत्रात भविष्य घडविण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे विभागीय केद्र, नागपूर येथील लक्ष्मीनारायण इंस्टिटयुट ऑफ टेक्नालॉजी परिसरात सुरू करण्यात आले, केंद्राच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु, डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ संजय दुधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु कारभारी काळे, कुलसचिव भगवान जोगी, प्रा. राजु पावडे आदी उपस्थित होते.

तंत्रशिक्षणासाठी स्वतंत्र्य विद्यापीठ असावे, या संकल्पनेतून विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली आहे . यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य राहील, असे त्यांनी सांगितले होते. बाटू कायद्यांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची निर्मिती लोणारे-रायगड येथे करण्यात आली. राज्यात चार ठिकाणी या विद्यापीठाचे विभागीय केंद्र सुरु करण्यात आले आहेत. नागपूर येथे विभागीय केंद्र सुरु करण्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने दिलेल्या सहयोगाबाबत श्री.सामंत यांनी अभिनंदन केले.

मुंबई विद्यापीठाप्रमाणे या विद्यापीठाचे ब्रँड तयार करण्यात येणार असून जागतिक तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या दर्जाचे विद्यापीठ ठरेल. विद्यापीठाशी संलग्न करण्यासाठी महाविद्यालयाच्या संस्था चालकांना प्रोत्साहित करा, दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी शिक्षण क्षेत्रातील बाटू कायद्या अंतर्गत या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली, असे सांगितले. पारंपारिक विद्यापीठाव्यतिरिक्त टेक्नालॉजीसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, या मताशी सहमत असल्याने विभागीय केंद्र सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

पुणे व मुंबई विद्यापीठातील तंत्रशिक्षण दर्जेदार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल तिकडे आहे. हा गैरसमज दूर होण्यासाठी या विद्यापीठाचे कार्य सातत्याने राहील. व दर्जेदार तंत्र शिक्षण येथे मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु कारभारी काळे यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देतांना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे राज्यातील पहिले केद्र औरंगाबाद येथे असून दुसरे केंद्र विदर्भातील नागपूर येथे सुरु करण्यात आले आहे. या विद्यापीठाद्वारे विद्यार्थी व सामाजिक हिताच्या दृष्टीने कार्य करण्यात येणार आहे. महाविद्यालयात एकसंघता आल्याने तांत्रिक क्षेत्रात प्रगती होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी कोनशिलेचे अनावरण तद्वतच डॉ. आंबेडकर, शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. दीप प्रज्वलन करुन राष्ट्रगिताद्वारे कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. उपस्थितांचे आभार कुलसचिव भगवान जोगी यांनी मानले. या कार्यक्रमास संस्थाचालक, प्राध्यापक, शिक्षक व प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.