- नागपुर समाचार

19 ते 24 मार्च दरम्‍यान खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा दुसरा टप्‍पा – ‘श्रीवल्‍ली’ फेम जावेद अली घालणार तरुणाईला भुरळ – शंकर महादेवन, सुनिधी चव्‍हाण, हेमामालिनी यांच्‍या उपस्‍थ‍ितीने गाजणार – डिजिटल पासेसची सुविधा

19 ते 24 मार्च दरम्‍यान खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा दुसरा टप्‍पा
– ‘श्रीवल्‍ली’ फेम जावेद अली घालणार तरुणाईला भुरळ
– शंकर महादेवन, सुनिधी चव्‍हाण, हेमामालिनी यांच्‍या उपस्‍थ‍ितीने गाजणार
– डिजिटल पासेसची सुविधा

नागपुर:- राज्‍य सरकारच्‍या कोविड निर्बंधामुळे डिसेंबरमध्‍ये खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला अचानक ब्रेक लागला. तरुणाईचे लाडके गायक, संगीतकार शंकर महादेवन आणि ड्रिमगर्ल हेमामालिनी यांचे कार्यक्रम रद्द झाले होते. हे कार्यक्रम पुन्‍हा व्‍हावे, अशी वाढती लोकभावना लक्षात घेऊन खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समिती येत्‍या, 19 ते 24 मार्च दरम्‍यान सहा दिवसाचा खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवी धमाका घेऊन येत आहे. ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्‍ये होणा-या या महोत्‍सवात ‘श्रीवल्‍ली’ फेम जावेद अली, सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चव्‍हाण यांच्‍यासह शंकर महादेवन, अभिनेत्री हेमामालिनी आणि इतर अनेक राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय कलाकार महोत्‍सवात हजेरी लावणार आहेत.

साहित्‍य, संस्‍कृती, संगीत, नाट्य, नृत्‍य अशा अनेक कलांचा संगम असलेला खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सव केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांनी मध्‍य भारताच्‍या सांस्‍कृतिक विश्‍वाला दिलेली मोठी देणगी आहे. केवळ मध्‍य भारतातच नव्‍हे तर संपूर्ण देशात खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाची चर्चा होऊ लागली असून अनेक राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय ख्‍यातीचे कलाकार या महोत्‍सवात आपली कला सादर करण्‍यासाठी उत्‍सूक आहेत.
मागील वर्षी 17 ते 26 डिसेंबर दरम्‍यान ईश्वर देशमुख कॉलेज ग्राउंडमध्‍ये भव्‍य स्‍वरूपात महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले होते. ‘स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव’ या मध्‍यवर्ती संकल्‍पनेवर आधारित कार्यक्रमांची रेलचेल होती. सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग, सुफी गायक कैलाश खेर, पं. विजय घाटे, पंडिता मंजुषा पाटील, पं. राकेश चौरस‍िया, प्रख्यात कवी कुमार विश्‍वास, सय्यद पाशा, हास्‍यजत्राची चमू अशा दिग्‍गज कलाकारांनी आपली कला सादर करीत नागपूरकरांना मंत्रमुग्‍ध केले होते. परंतु, राज्‍य सरकारने अचानक लावलेल्‍या निर्बंधामुळे सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन व प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्‍यांगना हेमामालिनी यांचा समारोपीय कार्यक्रम रद्द करावा लागला होता.
नृत्‍य-संगीत-काव्‍याची मेजवानी
खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला पूर्णत्‍व प्राप्‍त करून देण्‍यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या नेतृत्‍वात परत एकदा तयारी सुरू करण्‍यात आली असून यावेळचे कार्यक्रम नागपूकरांसाठी मनोरंजनाचा बोनान्‍झा ठरणार आहेत. शंकर महादेवन यांच्‍या ‘माय कन्‍ट्री… माय म्‍युझिक’ या लाईव्‍ह इन कॉन्‍सर्टने कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून ‘इंडीपॉप क्‍वीन’ म्‍हणून ओळखली जाणारी सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट, स्‍त्री-पुरूष अशा दोघांच्‍याही आवाजात युगल गीते गाणारे ‘वंडर व्‍हॉईस’ साईराम अय्यर यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट, ‘पुष्‍पा’ या ब्‍लॉकबस्‍टर चित्रपटातील ‘श्रीवल्‍ली’ गाण्‍याने तरुणाईला भुरळ घालणारे सुप्रसिद्ध पार्श्‍वगायक जावेद अली यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’ तसेच, पद्मश्री सुरेंद्र शर्मा, पद्मश्री सुरेंद्र दुबे, प्रसिध्द विररस कवयीत्री सुश्री कविता तिवारी, डॉ विष्णू सक्सेना, अरुण जेमिनी, डॉ प्रवीण शुक्ला यांचे हास्‍य व्यंग कवी सम्मेलन असा भरगच्‍च कार्यक्रम राहणार आहे. महोत्‍सवाचा समारोप पद्मश्री हेमामालिनी यांची प्रस्‍तुती असलेल्‍या ‘राधा रासबिहारी’ या नृत्‍य नाटिकेने होईल.

डिजिटल पासेसची सुविधा: –
शहरातील नागरिकांना खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा आनंद लुटता यावा यासाठी यावेळीदेखील डिजिटल पासेसची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली आहे. 9158880522 मोबाईल क्रमांकावर मिसकॉल दिल्‍यास घरबसल्‍या डिजिटल पासेस प्राप्‍त करता येतील. यावेळी डिजिटल पास धारकांच्या प्रवेशासाठी गेट क्र. 2 राखीव ठेवण्‍यात येणार आहे. शिवाय, उन्‍हाळा लक्षात घेता पिण्‍याचे पाणी व स्‍वच्‍छतागृहाची सुविधादेखील चोख ठेवली जाणार आहे.
नागपूर-विदर्भाची व मध्‍य भारताची शान असलेल्‍या या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, सर्व उपाध्‍यक्ष प्रा. मधुप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्‍यक्ष प्रा. राजेश बागडी, सर्व सदस्‍य बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, हाजी अब्‍दुल कादीर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर, आशिष वांदिले, चेतन कायरकर, भोलानाथ सहारे, किशोर पाटील यांनी केले आहे.
…………………
वेळापत्रक
शनिवार, 19 मार्च – ‘माय कंट्री… माय म्‍युझिक’ : गायक, संगीतकार शंकर महादेवन यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट व उद्घाटन
रव‍िवार, 20 मार्च – ‘इंडिपॉप क्‍वीन’ सुनिधी चौहान यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट
सोमवार, 21 मार्च – ‘वंडर व्‍हाईस’ साईराम अय्यर यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट
मंगळवार, 22 मार्च – ‘व्‍हर्सटाईल’ जावेद अली यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट
बुधवार, 23 मार्च – हास्‍य कवी संमेलन – सहभाग : पद्मश्री कवी सुरेंद्र शर्मा, पद्मश्री सुरेंद्र दुबे, अरूण जेमिनी, डॉ. प्रवीण शुक्‍ला, कविता तिवारी व डॉ विष्‍णू सक्‍सेना
गुरुवार, 24 मार्च – पद्मश्री हेमामालिनी यांची ‘राधा रासबिहारी’ नृत्‍यनाटिका व समारोप.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *