
‘महापौर स्वररत्न’ स्पर्धेचे ऑडिशन २० डिसेंबरपासून
नागपूर समाचार : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने हिंदी-मराठी गीतांची बहारदार गायन स्पर्धा ‘महापौर स्वररत्न’चे आयोजन करण्यात आले आहे. वयोगट ७ ते १७ वर्षे, १८ ते ४० वर्षे आणि ४१ वर्षे व पुढील वयोगटासाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी २० ते २५ डिसेंबर दरम्यान ऑडिशन होईल. २० डिसेंबर रोजी गांधीबाग उद्यान येथे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. उद्घाटन कार्यक्रमाला क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, नगरसेवक प्रमोद चिखले, नागेश सहारे, उपायुक्त विजय देशमुख, क्रीडा अधिकारी पियुश आंबुलकर, संस्थांचे प्रीती दास आणि लकी खान उपस्थित राहतील.
स्पर्धेसाठी सहाही विधानसभा क्षेत्रामध्ये ऑडिशन फेरी घेण्यात येणार आहे. पूर्व नागपूरमध्ये २१ डिसेंबर, दक्षिण नागपूरमध्ये २२ डिसेंबर, उत्तर नागपूरमध्ये २३ डिसेंबर, दक्षिण-पश्चिममध्ये २४ डिसेंबर आणि पश्चिम नागपूरमध्ये २५ डिसेंबर रोजी ऑडिशन फेरी होईल. ऑडिशनमध्ये निवडण्यात आलेल्या गायकांना उपांत्यफेरीत प्रवेश मिळेल. २९ डिसेंबर रोजी स्पर्धेची उपांत्य फेरी होईल. यानंतर ४ जानेवारी २०२२ रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी होईल. अंतिम स्पर्धेमध्ये वेबसिरीज इशा डायरीचे प्रमुख कलाकार उपस्थित राहतील. या स्पर्धेचे विजेत्यांना प्रथम पुरस्कार २१००० रुपये, द्वितीय पुरस्कार ११००० रुपये आणि तृतीय पुरस्कार ७००० रुपये देण्यात येईल.
या कार्यक्रमाला आई फाउंडेशन, आगाज फाउंडेशन, मी निर्मोही संस्थेचे सहकार्य आहे. लकी म्यूझिकल इंटरटेन्मेंटच्या माध्यमाने स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धा नि:शुल्क असून यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेण्यात येणार नाही. नागपूर शहरातील ३५ तज्ज्ञ या कार्यक्रमात सहभाग घेतील. अधिक माहितीसाठी लकी खान (८८८८८९९३२१) यांच्याशी संपर्क साधा.