
कमीत कमी कागदपत्रांसह सहजतेने करा ऑनलाईन अर्ज
नागपूर समाचार : कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनातर्फे ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉग इन करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावरून कोविड-१९ मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, वारसांना ऑनलाईन अर्ज करायचे असून नागरिकांनी अर्ज करतेवेळी संबंधित कागदपत्रे व मोबाईल सोबत ठेवणे आवश्यक आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सुविधा केंद्रावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून अर्जात अतिशय सोपी माहिती द्यावी लागणार आहे. शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
कोरोनामुळे मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारांनी mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉग इन करून मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड, (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात), मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदाराचा आधार संलग्न बँक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) आणि रुग्णालयाचा तपशील, आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस कोरोनाचे निदान झाले, अशी कागदपत्रे (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) अपलोड करावे. या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळविण्यासाठी लॉग इन करता येईल.
एका मृत व्यक्तीसाठी एकाच जवळच्या नातेवाईकांना अर्ज करता येईल. अनेक नातेवाईकांनी केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह साहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल. अर्ज सादर करण्याबाबत व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in या पोर्टलवर डॉक्युमेंट रिक्वायर्ड या टॅबवर उपलब्ध आहे.
शासनाच्या सदर योजनेबाबत विस्तृत माहितीसाठी नागपूर जिल्हा प्रशासनाद्वारे क्यूआर कोड जारी करण्यात आले आहे. या कोडला स्कॅन करून आवश्यक माहिती मिळेल. नागरिकांच्या असहाय्यतेचा फायदा घेउन ऑनलाईन अर्ज भरून देण्याच्या नावावर फसवणूक करण्याचे प्रमाण घडतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. फसवणुकीचे प्रकार घडल्यास त्वरीत नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये माहिती द्यावी, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.