- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर समाचार: नागपूरचे शहर गीत व्हावे यासाठी महापौरांना निवेदन

नगरसेवक ॲड.निशांत गांधी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडाळाने घेतली महापौरांची भेट

नागपूर समाचार : भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय महत्व प्राप्त असलेल्या नागपूर शहराचा गौरवशाली इतिहास आहे. या इतिहासाला व शहराला लौकीक प्राप्त व्हावे याउद्देशाने नागपूर शहराचे स्वत:चे एक शहर गीत (अँथम) असावे, या मागणीसंदर्भात गुरूवारी (ता.२१) महापौर दयाशंकर तिवारी यांना नगरसेवक ॲड.निशांत गांधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.

शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सदस्य बाळासाहेब कुळकर्णी, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष नरेश गडेकर, निवेदिका रेखाताई दंडिगे, हास्यकवी व साहित्यिक प्रा. मनिष बाजपेयी, कवी लोकनाथ यशवंत, साहित्यिक सागर खादीवाला, चित्रकार संजय मोरे, कवी व साहित्यिक महेश तिवारी आदी उपस्थित होते.

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असलेले शहर असून शहराला भौगोलिक तसेच सांस्कृतिक संदर्भातही गौरवशाली इतिहास लाभला आहे. या शहराला मध्यप्रदेशाची राजधानीचा सुद्घा गौरव मिळाला आहे. राज्याची उपराधानी असलेले नागपूर शहर आज विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहे. देशात आणि जगात आपली वेगळी छाप उमटविलेल्या या शहराचा इतिहास, विकास नव्या पिढीला ज्ञात व्हावा, त्यांना प्रेरणा मिळावी, शहराप्रति त्यांनीही आपली जबाबदारी ओळखून कार्य करावे, यासाठी शहराचे एक गीत (अँथम) असावे व त्यासंदर्भात मनपाद्वारे कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाद्वारे महापौरांना करण्यात आली.

अभिनव संकल्पनेबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी नगरसेवक ॲड.निशांत गांधी यांच्यासह शिष्टमंडळातील सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले. शहर गीत असावे ही उत्तम संकल्पना व सूचना असून यासंदर्भात मूर्तरूप देण्याबाबत लवकरच प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराचे गीत हे मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक असून यामध्ये आपल्या शहरातील नागरिकांचा समावेश असावा यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. नागरिकांसाठी शहर गीत संदर्भात स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल. यामधून अनेक सुंदर रचना प्राप्त होतील, त्यातील उत्कृष्ट रचना निवडून त्यास लयबद्ध करण्यात येईल, असा मानस यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला.

महापौरांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल शिष्टमंडळाद्वारे त्यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *