
सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी घेतला विभागाच्या योजनांचा आढावा
नागपूर समाचार : नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाद्वारे विविध योजना राबविण्यात येतात. समाजविकास विभागांतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी झोनस्तरावर समूह संगठकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समूह संगठकांद्वारे झोनस्तरावर सभापती, नगरसेवकांशी समन्वय साधून योजनांची माहिती दिली जावी यासोबतच विभागाच्या सर्व योजनांची माहितीपुस्तिका तयार करून ती सर्व नगरसेवकांना वितरीत करण्यात यावी, असे निर्देश मनपातील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजनांचा सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी गुरूवारी (ता.२१) झोननिहाय आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे होत्या. बैठकीत सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, समितीच्या सदस्या उज्ज्वला शर्मा, सोनाली कडू, रुपाली ठाकुर, मंगला लांजेवार, उपायुक्त राजेश भगत, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर, दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे शहर अभियान व्यवस्थापक विनय त्रिकोलवार, रितेश बांते, नूतन मोरे यांच्यासह दहाही झोनचे समूह संगठक उपस्थित होते.
यावेळी सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांच्यासह उपस्थित पदाधिका-यांनी समाजविकास विभागाच्या योजनांची माहिती व झोननिहाय त्याच्या अंमलबजावणी संदर्भात माहिती जाणून घेतली. दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे शहर अभियान व्यवस्थापक विनय त्रिकोलवार, रितेश बांते, नूतन मोरे यांनी योजनांची माहिती सादर केली.
शहरातील महिला, दिव्यांग, पथविक्रेते यांच्यासह अन्य वर्गांसाठी असलेल्या मनपासह केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी विभागातर्फे करण्यात येते. या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा, योग्य माहिती त्यांना पुरविली जावी यासाठी प्रत्येक झोनमध्ये समूह संगठकांची नियुक्ती करण्यात आली आहे. समूह संगठकांनी झोन सभापती, नगरसेवक, सहायक आयुक्त यांच्याशी योग्य समन्वय साधून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षण कार्य, झोनमध्ये समूपदेशन आणि समन्वयन या सर्व बाबींचे योग्य नियोजन करून कार्य करण्याचे निर्देशही सत्तापक्ष नेत्यांनी दिले.
समूह संगठकांद्वारे दर महिन्याला झोन सभापतींना योजना आणि त्याच्या लाभार्थ्यांची माहिती सादर करण्यात यावी. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त योग्य लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचला जावा यासाठी प्रभागस्तराव नगरसेवकांचे सहकार्य घेण्यात यावे. याशिवाय नगरसेवकांना वेळोवेळी योजनांची माहिती आणि त्यासाठी त्यांच्या अपेक्षित सहकार्याबाबत माहिती देण्यात यावी. समाजविकास विभागाद्वारे वेळोवेळी होत असलेले पत्रव्यवहार यासंबंधी झोनसभपतींशी समन्वय साधून त्याची माहिती नगरसेवकांना दिली जावी. योजनांच्या माहिती पुस्तिकेसह विभागाद्वारे करण्यात आलेले सामाजिक आर्थिक निकषावरील सर्वेक्षण आणि दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींचे सर्वेक्षण यासंबंधीची झोननिहाय यादी नगरसेवकांना सादर करण्यात यावी. विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींची सुद्धा यादी नगरसेवकांना देण्यात यावी, असे निर्देश उपायुक्त राजेश भगत यांनी सर्व समूह संगठकांना दिले.
महिला व बालकल्याण समिती अंतर्गत समाजविकास विभागाद्वारे जनहिताच्या सर्व योजना योग्य पात्र लाभार्थ्यांना पोहोचविण्यासाठी स्थानिक स्तरावर नगरसेवकांची मदत घेणे आवश्यक आहे. शिवाय झोन स्तरावर लाभार्थींना योग्य सहकार्य मिळावे त्यांच्या समस्या सोडविल्या जाव्यात यासाठी सौजन्यपूर्वक वागणूक आणि समन्वयाच्या भूमिकेतून कार्य केले जावे. याशिवाय सत्तापक्ष नेत्यांसह उपायुक्तांच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी दिले.