- नागपुर समाचार, मनपा

स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाच्या जनजागृतीची लोकचळवळ व्हावी : ना. नितीन गडकरी  नेताजी सुभाषचंद्र बोस आणि श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या जयंतीनिमित्त शहरात १२५ ठिकाणी सामूहिक झेंडागीत गायन

नागपूर, ता. १७ : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. अनेकांच्या योगदानामुळे आजचे हे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत. मात्र हे योगदान नव्या पिढीला ज्ञात नाही. श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी झेंडागीत लिहुन स्वातंत्र्य समरातील क्रांतिकारींमध्ये स्फुल्लींग चेतविले. श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी लिहिलेल्या झेंडागीताच्या ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहें हमारा’ या ओळी आजही गर्वाने मान उंचावतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडागीताचे सामूहिक गायन हा देशभक्ती जागवून नव्या पिढीला स्वातंत्र्याच्या इतिहासाशी जोडण्याचा पथदर्शी उपक्रम आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाचे वेळोवेळी स्मरण व्हावे, नवी पिढी या इतिहासाशी एकरूप व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाच्या जनजागृतीची लोकचळवळ व्हावी, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने नागपूर शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झेंडागीतचे रचयिता श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका, खादी ग्रामोद्योग आयोग आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील १२५ ठिकाणी मोठ्या उत्साहात सामूहिक झेंडागीत गायन करण्यात आले. शहरातील स्वयंसेवी संस्थांसह शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदविला. भारतमाता, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषभूषेसह अन्य स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या वेषभूषेत विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी विविध चौकांमध्ये देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले संपूर्ण शहरात पुन्हा एकदा स्वातंत्र्याचे रंग उधळलेले दिसून आले. शहरात सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

संविधान चौकामध्ये झेंडागीत गायनाच्या मुख्य कार्यक्रमाचा रविवारी (ता.१७) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मंचावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार पद्मश्री डॉ.विकास महात्मे, आमदार विकास कुंभारे, मनपा सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, केंद्र सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, बसपा गटनेता जितेंद्र घोडेस्वार, माजी आमदार प्रा.अनिल सोले, डॉ.मिलींद माने, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक तथा नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, नगरसेविका रुपा राय, उज्ज्वला शर्मा, प्रगती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक संदीप जाधव, आरोग्य समिती उपसभापती विक्रम ग्वालबंशी, माजी महापौर मायाताई इवनाते, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नगरसेवक सर्वश्री किशोर वानखेडे, किशोर जिचकार, अभय गोटेकर, ॲड.धर्मपाल मेश्राम, नागेश सहारे, निशांत गांधी, नगरसेविका मनीषा धावडे, निरंजना पाटील, उपायुक्त विजय देशमुख, उपायुक्त रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, कार्यकारी अभियंता अनील गेडाम आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी हातामध्ये राष्ट्रध्वज घेउन झेंडागीताचे गायन केले.

 

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पद्मश्री श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांनी रचलेले झेंडागीत पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समक्ष सरोजीनी नायडू यांनी गायले. प्रत्येक देशवासीयाच्या मनात आजही देशभक्तीचे बिजारोपण करण्याची क्षमता या गीतामध्ये आहे. या गीताचे एवढ्या व्यापक प्रमाणात सामूहिक गायन करून मनपाने श्यामलाल गुप्त यांना केलेले अभिवादन हे स्तूत्य आहे, अशा शब्दांत त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

 

देशभक्ती गीतांची विशेष स्पर्धा घ्या

स्वातंत्र्य समराच्या लोकचळवळीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आवश्यक असून त्यांचा व्यापक प्रमाणात सहभाग असावा यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्याची सूचना यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ‘आझादी-७५’च्या निमित्ताने नागपूर शहरातील किमान १ लाख विद्यार्थी स्वातंत्र्यगीतामध्ये सहभागी व्हावेत त्यांना गीताच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीचा परिचय व्हावा त्यांनी इतिहास जाणून घ्यावा या यामागील उद्देश आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. यामध्ये शहरातील सर्व शाळांचा सहभाग घेण्यात यावा. दहाही झोनस्तरावर या स्पर्धेचे आयोजन करून विजयी संघांना आकर्षक रोख पुरस्कार खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे देण्यात येतील. शहरात देशभक्तीपर वातावरण निर्माण करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात प्रत्येकाला सहभागी करून घेण्याचा मानस असल्याचेही ना. नितीन गडकरी यांनी सांगितले.

याशिवाय रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये मोठी स्क्रीन लावण्यात आली असून येथे शहरातील विद्यार्थ्यांना देशभक्तीपर चित्रपट दाखविण्यात यावे, यासंदर्भात मनपाने नियोजन करण्याचेही त्यांनी सूचित केले.

जेव्हा मनपाच्या शिक्षकांनी गायले मुंबईत स्वागत गीत

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईमधील सायन पूलाच्या लोकार्पण प्रसंगी मनपाच्या शिक्षकांनी सादर केलेल्या गीतासंबंधी आठवण सांगितली. १९९८ साली ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सायन येथील पूलाचे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वागत गीत सादरीकरणासाठी विशेषरूपाने नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मनपाच्या शिक्षकांनी सादर केलेल्या गीतांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केल्याची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.  

याशिवाय त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शाळेत असताना स्वातंत्र्य चळवळीवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात त्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत सहभाग घेतल्याने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास केला व त्यानुसारच भाषणात मांडणी केली परिणामी वक्तृत्व स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविल्याची आठवण त्यांनी सांगितली. नागपूर शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केल्यास विद्यार्थी इतिहासाचा अभ्यास करतील त्यातून त्यांना आपल्या स्वातंत्र्य चळवळीची माहिती होईल, यामधील विजेत्यांना खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे पुरस्कार देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

 

याप्रसंगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झेंडागीताच्या सामूहिक आयोजनासंदर्भात नागपूर महानगरपालिकेचे अभिनंदन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर शहरात सर्वत्र देशभक्तीचे वातावरण तयार करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झेंडागीतचे रचयिता श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या जयंतीदिनी झालेले हे आयोजन दोन्ही नेत्यांच्या स्मृतींची आठवण असून अशा देशभक्ती चेतविणा-या कार्यक्रमाद्वारे त्यांना अभिवादन करणे ही गर्वाची बाब आहे. ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा’ या स्वातंत्र्य संग्रामापासून अजरामर ओळी आहेत. या ओळींचा उच्चार आजही देशभक्तीची भावना निर्माण करते. आपला देश, संविधान आणि राष्ट्रध्वज हे आपले भूषण आहेत ते सदैव चिरायू राहोत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकामध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विषद केली. ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त नागपूर शहरात विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झेंडागीचे रचयिता श्यामलाल गुप्त ‘पार्षद’ यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त नागपूर शहरातील १२५ चौकांमध्ये सामूहिक झेंडागीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. १२५ ऐवजी १३० चौकांमध्ये या कार्यक्रमांच्या आयोजनाची विनंती करण्यात आली. यामध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी संस्थांनी सुद्घा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शहरामध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण करणारे कार्यक्रम आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेच्या बॅरी. वानखेडे विद्यानिकेतन शाळेतील शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी झेंडागीतासह अन्य देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन मधू पराड यांनी केले.

यांचे लाभले सहकार्य

टिळक पुतळा चौकामध्ये आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात सामूहिक झेंडागीत गायन करण्यात आले. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी कॉटन मार्केट चौक येथे सामूहिक झेंडागीत गायन केले. कार्यक्रमात खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे भारतीय राष्ट्रध्वज देण्यात आले. या अभिनव कार्यक्रमाला लायन्स क्लब, नागविदर्भ चेम्बर ऑफ कामर्स, ताजाबाद ट्रस्ट, मैत्री परिवार, कैट, नागपूर चेम्बर ऑफ कामर्स लिमिटेड, तेजस्विनी महिला मंच, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, भारत विकास परिषद, विदर्भ सेवा समिती, पालीवाल सेवा मंडल, श्रध्दा बहुउददेशीय संस्था, निराला सोसायटी, गुप्ताजी समाज, अयोध्यावासी वैश्यनगर सभा, विप्र फाऊंडेशन, सीताबर्डी व्यापारी संघ, गुजराती समाज, शाहू समाज कल्याण सोसायटी, विदर्भ आप्टीकल असोसिएशन, गेहोई वैष्व समाज, सराफा बाजार असोसिएशन, खंडेलवाल समाज, देवता फाऊंडेशन, शिवहरे समाज, प्रयास ग्रीन संस्था, दोसर वैश्य महासभा, अग्रहरी वैश्य समाज, ब्राम्हण सेना, नागपूर जैन समाज, विश्व सिंधी सेवा संगम, आदिवासी विकास युवा महासंघ, मो.रफी मंच, सिंधी हिंदी विद्या समिती आदी संस्थांचे सहकार्य लाभले.

 

 

या चौकात झाले सामूहिक झेंडागीत गायन

टेलिफोन एक्सचेंज्‍ चौक, डिप्टी सिग्नल चौक, लता मंगेशकर गार्डन चौक, कळमना गाव चौक, भरतवाडा चौक, कामगार नगर चौक, टिपू सुल्तान चौक, कपिलनगर चौक, दुर्गामाता मंदिर चौक, टेकानाका, कामठी रोड, अवस्थीनगर चौक / चोपडे लॉन, अशोक नगर चौक, सावरकर नगर चौक, शारदा चौक, तुकडोजी पुतळा चौक, टी. व्ही. टॉवर चौक, नंगा पुतळा चौक, रामनगर चौक, शिवणगाव बस स्टॉप, शितला माता चौक, उमरेड रोड, जयताळा चौक, बसवेश्वर चौक, संविधान चौक, अशोक चौक, घाट रोड, मानस चौक, बर्डी, मानेवाडा चौक, दिक्षाभुमी चौक, अजनी चौक, रहाटे चौक, लोकमत चौक, काँग्रेस नगर चौक, सोमलवाडा चौक, एयर पोर्ट चौक, छत्रपती चौक, लक्ष्मीनगर चौक, खामला चौक, जयताळा चौक, त्रिमुर्ती नगर चौक, पांढराबोळी चौक, प्रताप नगर चौक, अभ्यंकर नगर चौक, माटे चौक, श्रद्धानंद पेठ चौक, सुभाष नगर टी पॉईंट चौक, ट्राफिक वार्ड चौक, शंकर नगर चौक, रामनगर चौक, बजाजनगर चौक, पंचशिल चौक, झांसी राणी चौक, व्हेरायटी चौक, झिरो माईल चौक, संविधान चौक, महाराज बाग चौक, पत्रकार कॉलनी विदर्भ हॉकी असोसिएशन चौक, मुंजे चौक, लॉ कॉलेज चौक, कॉफी हाऊस चौक, लक्ष्मी भवन चौक, जी.पी.ओ. चौक, भोले पेट्रोल पंप चौक, रविनगर चौक, विधान भवन चौक, आकाशवाणी चौक, एल. ए. डी. कॉलेज चौक व अन्य ठिकाणी सामुहिक गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *