- नागपुर समाचार, मनपा

रिक्त पदभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करा महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश : अविनाश ठाकरे यांचा स्थगन प्रस्ताव

नागपूर, ता. ८ : नागपूर महानगरपालिकेमध्ये कामाचा व्याप वाढत असला तरी कर्मचारी संख्या अद्यापही वाढली नाही. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या, प्रश्नांना सोडविण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. मनपामध्ये अद्याप मंजुर पदांपैकी ५० टक्केच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे रिक्त पदभरती संदर्भात राज्य शासनाकडे लवकरात लवकर प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी प्रशासनाला दिले.

            मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये बुधवारी (ता.८) सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी कर्मचा-यावर पडणारा कामाचा ताण लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेमध्ये कर्मचा-यांची रिक्त पदे भरण्या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर महापौरांनी उपरोक्त निर्देश दिले.

            आपल्या विवेचनात सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे म्हणाले, महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १२ हजार कर्मचारी होते. त्यानंतर नागपूर शहराच्या लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसह शहरातील रस्ते, स्वच्छतेचे कार्य यासर्वांमध्ये वाढ झाली. त्यामुळे मनपामधील विविध विभागातील कामही वाढले आहे. आरोग्य विभाग, बांधकाम, अग्निशमन, उद्यान, नगररचना, मालमत्ता कर अशा मनपाच्या सर्वच विभागातील काम वाढले असले तरी कर्मचारी संख्या मात्र कमीच राहिली आहे. या विभागांमध्ये ५० टक्के तर काहींमध्ये त्यापेक्षाही कमी कर्मचारी संख्या आहे. त्यामुळे काम करण्यामध्ये प्रशासनाला अडचणी येतात. मनपाचे अनेक विभाग नाईलाजाने कंत्राटदारांच्याच भरवशावर सुरू आहेत. विद्युत विभागामध्ये एका कनिष्ठ अभियंत्याला तीन-तीन झोनचे काम बघावे लागते. त्यामुळे मनपामध्ये कर्मचारी भरती होणे ही गरज आहे.

            देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूर शहराच्या विकास कामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला. त्याबळावर शहरात अनेक विकास कामे होत आहेत. मात्र ही विकास कामे पूर्णत्वास नेण्यात, वेळेत पूर्ण करण्यात आवश्यक अधिकारी व कर्मचा-यांची कमतरता असल्याने यात अडचणी निर्माण होतात. कोरोनाच्या काळामध्ये राज्य शासनाने पदभरतीला स्थगिती दिली होती. मात्र आता ती स्थगिती हटविण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी लोकांना उत्तम सेवा देण्यासाठी मनपाच्या प्रत्येक विभागामध्ये पुरेसे कर्मचारी असणे आवश्यक आहे, त्यामुळे प्रशासनाद्वारे कार्यवाही करून राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी केली.

            सत्तापक्ष नेत्यांच्या विवेचनानंतर महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपातील अपु-या कर्मचा-यांच्या संख्येवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे मत मांडले. शहर सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मनपाच्या अग्निशमन विभागामध्ये तब्बल ७०५ कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. मनपाच्या विविध विभागांचा विचार करता संपूर्ण मनपामध्ये मंजुर पदांनुसार ४४५८कर्मचा-यांची भरती होणे आवश्यक आहे. ही सर्व रिक्त पदे भरली गेल्यास शहरातील विकास आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या कार्यात गती प्रदान होउ शकेल. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात त्वरीत कार्यवाही करीत राज्य शासनाकडे पदभरती संदर्भात तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावे, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *