- नागपुर समाचार, मनपा

विकासाची जबाबदारी आमची, संवर्धनाची जबाबदारी नागरिकांची ना. गडकरी आणि फडणवीस यांचे आवाहन: सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

नागपूर, ता. २८ : नागपूर शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, उद्योग यासह प्रत्येक क्षेत्रात क्रमांक एकचे शहर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या शहराच्या चौफेर विकासाची जबाबदारी आमची असली तरी संवर्धनाची आणि हा विकास टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. २८) ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. विकास महात्मे प्रमुख पाहुणे म्हणूं उपस्थित होते.  अध्यक्षस्थानी महापौर दयाशंकर तिवारी होते. यावेळी मंचावर आ. परिणय फुके, आ. प्रवीण दटके, राज्याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., लक्ष्मी नगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, विधी समिती सभापती ऍड. मीनाक्षी तेलगोटे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, माजी महापौर तथा नगरसेवक नंदा जिचकार, संदीप जोशी, प्रभाग ३६ चे नगरसेवक लहुकुमार बेहते, प्रदेश महिला भाजपच्या महामंत्री अश्विनी जिचकार, लक्ष्मी नगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, सार्वजनिक अभियांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, पर्यावरण विभागाचे संदीप लोखंडे, रूपराव राऊत, सोनेगाव तलाव बचाव संघर्ष समितीचे गोपाल ठोसर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, जे देशात कुठे घडले नाही असे नागपुरात घडत आहे. डबल डेकर वाहूतुक असो, झिरो माईल मेट्रोचे २० मजली स्टेशन असो, सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्प असो की २४ तास पाणी देणारी योजना असो असे अनेक उपक्रम नागपुरात सुरू आहे. मिहान मध्ये आतापर्यंत ५७ हजार युवकांना नोकऱ्या मिळाल्या पुढील तीन वर्षात हा आकडा एक लाखावर नेण्यात येईल. अकरा सीटर जेट विमान इथे तयार होईल. इलेक्ट्रीक वाहने नागपुरात धावतील, इथेनॉलचा पंप येथे तयार होतोय हे सारे देशातील इतर शहरांसाठी आश्चर्यकारक आहे. नागपूरला सर्वांगीण विकासाच्या बाबतीत क्रमांक १ वर नेण्याची जबाबदारी आमची आहे, मात्र ते टिकवून ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांची आहे, असे ते म्हणाले. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकलो, असेही ते म्हणाले. शहरात नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या अनेक विकास कामांचा गौरउल्लेख त्यांनी केला. मुख्यमंत्री असताना अनेक कार्यासाठी निधी प्राप्त करून दिल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. नगरसेवक संदीप जोशी यांनी सोनेगाव तलावासाठी खोलीकरण अभियान राबविले होते. त्याचाही त्यांनी उल्लेख केला. सोनेगाव तलावाच्या संवर्धनासाठी  सण १९७५ पासून संघर्षरत असलेले ज्येष्ठ नागरिक गोपाल ठोसर यांचा यावेळी ना. नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केले. आभार माजी महापौर तथा नगरसेविका नंदा जिचकार यांनी मानले. कार्यक्रमाला मनपाचे पदाधिकारी, विविध प्रभागातील नगरसेवक, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोनेगाव सौंदर्यीकरणाचे आर्किटेक्ट निशिकांत भिवगडे असून कंत्राटदार मे. एस. एस. पाटील अँड कंपनी आहे.

सोनेगावचे सौंदर्यीकरण लोकलढ्याचे फलित : देवेंद्र फडणवीस

सोनेगाव तलाव नागपूरचे वैभव आहे. हा तलाव गिळंकृत करण्याचा प्रकारही झाला. मात्र लोकांनी या तलावसाठी लढा दिला. या परिसराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आज या तलावाच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन होत आहे. हे सौंदर्यीकरण म्हणजे तलावासाठी झालेल्या लोकलढ्याचे फलित आहे, असे उद्गार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूर शहराला विकास करण्यासाठी गडकरींसारखे लोकनेते लाभले यांच्या नेतृत्वात या शहराचा सर्वांगीण विकास होतो आहे. एक सर्वेक्षणानुसार सण २०३० मध्ये वेगाने प्रगत होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचा क्रमांक पहिल्या दहा शहरांमध्ये असेल असे म्हटले. विकास कामांसाठी नगरसेवकही सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी प्रभाग ३६ च्या चारही नगरसेवकांनि यशस्वी पाठपुरावा केला, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

गडकरीची संकल्पना, फडणवीसांकडून निधी : महापौर

शहराच्या विकासात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनवीन संकल्पना मांडल्या. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात अनेक प्रकल्पांना निधी दिला. सोनेगाव तलाव सौंदर्यीकरण ही संकल्पनाही ना. नितीन गडकरींचीच. यासाठी निधी देवेंद्र फडणवीस यांनीच उपलब्ध करून दिला, याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी गौरोवोल्लेख करत दोन्ही नेत्यांचे आभार मानले. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध लोकोपयोगी प्रकल्पांची व उपक्रमांची माहिती त्यांनी आपल्या प्रस्ताविकपर भाषणात दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *