- नागपुर समाचार, मनपा

कोव्हिडकाळातील कोरोनायोद्धांच्या कार्याला सलाम : महापौर दयाशंकर तिवारी महापालिकेत ध्वजारोहण : कोरोना योद्धांचा सत्कार

नागपूर, ता. १५ : मागील वर्षीचा आणि या वर्षीचा संपूर्ण काळ हा कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यात गेला. संकटकाळात एकत्रित येऊन लढा देणे हीच या देशाची संस्कृती आहे. कोरोनासंकटातही नागपूर महानगरपालिकेतील प्रत्येक विभाग, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडले. अन्य फ्रंट लाईन वर्कर, समाजसेवी संस्थांनीही मोलाची कामगिरी बजावली. या कोरोनायोद्धांचे कार्य हे येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असेल, त्यांच्या कार्याला मी सलाम करतो, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित मुख्य समारंभा महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नागपूरकरांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., बसपाचे पक्ष नेते जितेंद्र घोडेस्वार, झोन सभापती सुनील हिरणवार, अभिरुची राजगिरे, वंदना भगत, माजी महापौर तथा नगरसेवक नंदा जिचकार, नगरसेवक निशांत गांधी, मो. इब्राहिम, अतिरिक्त आयुक्त राम जोशी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीचे ७५ वे वर्ष आहे. यानिमित्ताने शहरात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प महानगरपालिकेने केला आहे. महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या दृष्टीने तयार करण्याच्या उद्देशातून ‘सुपर ७५’ उपक्रमाचा शुभारंभ ९ ऑगस्ट रोजी करण्यात आला. शहरातील पुतळे राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांद्वारे देखभाल करणाऱ्या उपक्रमाचाही शुभारंभ ९ ऑग़स्ट रोजी झाला. यात सहभागी ३७५ विद्यार्थ्यांना अग्निशमन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ७५ हेल्थ पोस्ट पुढील महिन्यात पूर्णत्वास जातील ज्यांना वीर जवानांचे नाव देण्यात येईल.

लोकसहभागातून ७५ चौकांचे सौंदर्यीकरण करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. शहरातील १२ उद्यानांत १२ लघु सांडपाणी प्रकिया व पुनर्वापर प्रकल्प उभारण्यात येत आहे. ज्यातील तीन प्रकल्पांचे लोकार्पण आजच स्वातंत्र्यदिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यामुळे ४ कोटी लिटर भूजलाची बचत होणार आहे. गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी सहा विधानसभा क्षेत्रात सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता सहा विधानसभा क्षेत्रात यूपीएससी व अन्य स्पर्धा परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने सहा अभ्यासिका सुरू करण्यात येत आहे. खुल्या मैदानांवर ७५ ऑक्सिजन पार्कसची निर्मिती करण्यात येत आहे. हे चांगले प्रकल्प या शहरासाठी, शहरातील नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येत आहे. यात लोकांनी सहभाग देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यलढ्यातील नागपूरच्या इतिहासावर यावेळी त्यांनी प्रकाश टाकला.  छाती वर गोळी झेलणारेरे शहीद कृष्णराव काकडे, वयाच्या १८ व्या वर्षी फासावर चढून शहीद झालेले शंकर महाले, यांच्यासह हिंदुस्थानी लाल सेनेने गाजवलेले कर्तृत्व याचा अभिमानाने उल्लेख केला. कोरोना लढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आदींचे त्यांनी कौतुक करीत आभार मानले.

तत्पूर्वी महापौर दयाशंकर तिवारी यांनी ध्वजारोहण केले. यानंतर अग्निशमन विभाग जवानांच्या परेडचे निरीक्षण केले आणि सलामी दिली. यावेळी कोरोनाकाळात आपले कर्तव्य बजावणाऱ्या मनपातील अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन विभागातील जवानांचा त्यांच्या दुर्दम्य साहसाबद्दल मनपाचा दुपट्टा, तुळशी रोप आणि प्रमाणपत्र देऊन महापौर दयाशंकर तिवारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, सेवानिवृत्त सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, पशुचिकित्सा अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र् महल्ले, सफाई कामगार कुणाल परिहार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जैतवार, अग्निशमन विभागातील चालक विक्रम डोमे, प्रमुख अग्निशमन विमोचक शंकर बिजवे, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, भांडार लिपिक विनय बगले, शववाहिनी सहायक मजदूर रंजीत गायकवाड, स्थायी सफाई कामगार विश्वजीत डागोर, प्रभारी स्वास्थ निरिक्षक संजय गोरे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मो. ख्वाजा मोईनुद्दीन, परिचारिका ललिता भोंगाडे, कीटक संग्राहक अश्विन बोदेले, सफाई मजदूर दीपक कोल्हे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका शुभांगी पोहरे आणि मधु पराड यांनी केले. आभार सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी मानले. कार्यक्रमाला उपायुक्त निर्भय जैन, राजेश भगत, रवींद्र भेलावे, विजय देशमुख, मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरिश राऊत, किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *