- मनपा

मोकळ्या भूखंडातील स्वच्छता करून खर्चाची रक्कम होणार मालमत्ता कराच्या वसूलीप्रमाणे वसूल करण्यात येईल   डेंग्यू उपाययोजनांसदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचा महत्वपूर्ण निर्णय

नागपूर, ता. ४ : डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाद्वारे दैनंदिन सर्वेक्षण सुरू आहे. त्याअंतर्गत शहरातील अनेक मोकळ्या भूखंडांमध्ये झाडे, गवत वाढलेले आहे शिवाय डबके होउन त्यात पाणीही साचले आहेत. ही स्थाने डासोत्पत्तीसाठी कारणीभूत असून त्यामुळे रोगप्रसार होतो. त्यामुळे वस्तीच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या भूखंडांची स्वच्छता करून त्यासाठी लागणा-या खर्चाची रक्कम संबंधित भूखंड मालकाच्या मालमत्ता कराच्या वसूलीप्रमाणे वसूल करण्यात येणार आहे. डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

            शहरातील डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता संपूर्ण शहरामध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण कार्य सुरू आहे. सर्वेक्षणादरम्यान मनपाचे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाउन घरातील कुंड्या, कुलरची टाकी तसेच पाणी साचणा-या वस्तूंची पाहणी करतात. त्यात लारवा अर्थात डेंग्यूअळी आढळून आल्यास आवश्यक औषध टाकून ते नष्ट केले जाते. मनपाच्या आरोग्य पथकाद्वारे सुरू असलेल्या कार्याची मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यामार्फत विविध ठिकाणी आकस्मिक भेट देउन पाहणी करण्यात येत आहे. या पाहणीदरम्यान वस्तीलगत असलेल्या मोकळ्या भूखंडांमध्ये असलेल्या कचरा व घाणीमुळे डासोत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर मनपा आयुक्तांनी या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेत मनपाद्वारे भूखंडांची स्वच्छता करून त्यासाठी लागणारा खर्च भूखंडाच्या मालमत्ता कराच्या वसूलीप्रमाणे वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत.

            डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरीकांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळल्यानुसार डेंग्यूअळी आढळण्याचे प्रमाण हे घरामध्येच जास्त आहे. त्यातही कुलरच्या टाकीमध्ये डेंग्यूअळी लवकर वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वत: सतर्क राहून जबाबदारीने वागण्याची गरज आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला जावा. यात कुलरची टाकी, फुलदाणी, कुंड्यामधील पाणी काढून ते कोरडे करावे. जिथे पाणी साचून आहे अशा ठिकाणी डासअळी नष्ट करणारे औषध टाकण्यात यावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

मैदानांमध्ये वाहने पार्क करणा-यांवरही होणार कारवाई

            शहरामध्ये अनेक मोकळी मैदाने आहेत. अनेक भागात अशा मैदानांमध्ये वाहने उभी करून ठेवली जातात. पावसाळ्यात ही वाहने उभी राहत असल्याने वाहनांच्या चाकांमुळे मैदानात खड्डे तयार झालेली आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचले राहत असल्याने डासोत्पत्तीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मैदानांमध्ये वाहने उभी करणा-यांवरही कारवाई करण्याचा निर्णय मनपा आयुक्तांद्वारे घेण्यात आलेला आहे.

बुधवारी शहरातील ८३२५ घरांचे सर्वेक्षण

बुधवारी (ता.४)झोननिहाय पथकाद्वारे ८६८३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले.  यापैकी  ४४५ घरे ही दुषित आढळली म्हणजेच या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय ११३ ताप असलेले रुग्ण आढळून आले. २०६ जणांच्या रक्ताचे नमूने तर ४२ जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान २५३३ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात २५४ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे २५३ कुलर्स रिकामी करण्यात आले. ९६३ कुलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर ११२५ कुलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच १९२ कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *