- मनपा

सिमेंट रोडची अर्धवट कामे त्वरीत पूर्ण करा : महापौर दयाशंकर तिवारी

सिमेंट रोडची अर्धवट कामे त्वरीत पूर्ण करा : महापौर दयाशंकर तिवारी

बांधकाम साहित्यामुळे पावसाळी नाल्या बंद झाल्यास कंत्राटदारावर कारवाई

पावसाळ्यामध्ये रस्त्यावर जमा होणारे पाणी आणि त्यातून होणारे अपघात टाळण्यासाठी सिमेंट रोडची जी अर्धवट व उर्वरित कामे आहेत ती तातडीने पूर्ण करण्यात यावेत. शहरात सुरू असलेल्या सिमेंट रोड बांधकामामुळे बांधकाम साहित्य विखुरलेले आहेत. माती, सिमेंट व इतर विखुरलेले साहित्य तातडीने स्वच्छ करण्यात यावेत. बांधकाम साहित्यामुळे पावसाळी नाल्या बंद झाल्यास संबंधित रस्ता कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची शुक्रवारी (ता.९) बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक विजय (पिंटू) झलके, मुख्य अभियंता अजय पोहेकर, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) सोनाली चव्हाण उपस्थित होते. समिती सदस्या रूपा राय, वंदना भुरे, नगररचनाकार हर्षल गेडाम, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.
यावेळी शहरातील सिमेंट रोडच्या टप्पा १, २ व ३च्या कार्याचा महापौर व स्थापत्य समिती सभापतींनी आढावा घेतला. सिमेंट रोड टप्पा १ चे अनेक कामे बाकी आहेत. या उर्वरित कामाचे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया करणे, निर्धारित वेळेमध्ये काम पूर्ण न झाल्यास विहित खर्च मनपाला करावा लागेल व निर्धारित वेळेत पूर्ण झाल्यास कंत्राटदारालाच तो खर्च करावा लागतो. त्यामुळे विहित वेळेमध्येच कार्य होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. सिमेंट रोड टप्पा २ चे सुद्धा उर्वरित व अर्धवट कार्य त्वरीत पूर्ण करणे तसे सिमेंट रोड टप्पा ३ च्या कामासाठी नागपूर सुधार प्रन्यासकडून ३७.०५ कोटी व राज्य शासनाकडून ३७.०५ कोटी निधी अप्राप्त आहे. दोन्ही विभागाकडून सदर अप्राप्त निधी मिळविण्यासाठी प्रशासनाद्वारे त्वरीत प्रयत्न करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.
धरमपेठ झोन अंतर्गत रामदासपेठ येथील पूर्णचंद्र बुटी सभागृहाजवळ नाग नदीवर असलेल्या पुलाच्या संदर्भात प्राप्त तक्रारीवर दखल घेउन प्रत्यक्ष स्थळी जाउन पुलाचे अवलोकन करण्यात यावे. पुलाची स्थिती धोकादायक असल्यास त्यासंदर्भात त्वरीत प्रस्ताव सादर करण्यात यावा व तशी कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश महापौरांनी दिले. याशिवाय जम्मुदीप नगर नाल्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्यामुळे नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. हे काम पूर्णत्वास आणण्यासाठी राज्यशासनाकडून अप्राप्त असलेली राशी मिळविण्यासाठी सुद्धा प्रशासनाद्वारे विशेष प्रयत्न करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
बुधवार बाजार, महाल येथे व्यापारी संकुल तयार करण्याचे काम प्रस्तावित आहे. हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करणे. तसेच बीओटी चे जेवढे कार्य प्रलंबित आहेत त्यांना गती देण्याचेही महापौरांनी निर्देशित केले. कोरोना या वैश्विक महामहारीमुळे आरोग्य व्यवस्थेची शहरातील गरज लक्षात घेउन धरमपेठ येथील डिक दवाखाना परिसरात स्टेट ऑफ आर्ट टर्शरी केअर सुपर स्पशॅलिटी हॉस्पीटलचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. या हॉस्पीटलच्या बांधकामासाठी जलद गतीने प्रशासनाने पाउल उचलावे व आवश्यक ती कार्यवाही गतीशीलतेने पूर्ण करावी, असेही निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी बैठकीत दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *