- नागपुर समाचार

नागपूर जिल्ह्यात विक्रमी लसीकरण, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

एका दिवसांत 25 हजार 545 लसीकरण

नागपूर, दि. 8 : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण
अत्यंत आवश्यक असल्यामुळे ग्रामीण भागातील
जनतेमध्ये लसीकरणाचे महत्त्व घरोघरी पोहचविण्यासाठी
राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यात एकाच दिवशी
सर्वाधिक म्हणजे 25 हजार 545 नागरिकांचे लसीकरण
करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आदिवासी व अति दुर्गम
भागातील नागरिकांमध्ये असलेला गैरसमज दूर करुन
लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश येत असल्याची
माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी
आज दिली.

जिल्ह्यातील 18 वर्षांवरील नागरिकांना कोविडवरील लस
देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
लसीकरणाबाबत असलेला गैरसमज दूर करुन
लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने
घेतला आहे. या मोहिमेंतर्गत काल 25 हजार 545
नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये 18 ते 44
या वयोगटातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
एकाच दिवशी या वयोगटातील 13 हजार 93 नागरिकांनी
लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यासोबतच 45 ते 60
या वयोगटातील तसेच 60 वर्षांवरील नागरिकांना पहिला व
दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येत आहे. काल झालेल्या
लसीकरणामध्ये 15 हजार 538 नागरिकांना पहिला डोस
तर 10 हजार 60 नागरिकांना दुसरा डोस देऊन जिल्ह्यात
एकाच दिवशी लसीकरणाचा उच्चांक केला असल्याची
माहिती योगेश कुंभेजकर यांनी दिली.

तालुकानिहाय झालेल्या लसीकरणामध्ये सर्वाधिक
लसीकरण नागपूर ग्रामीणमध्ये 2 हजार 975 नागरिकांचे
लसीकरण करण्यात आले. सावनेर तालुक्यात 2 हजार
643, हिंगणा तालुक्यात-2 हजार 470, कामठी
तालुक्यात- 2 हजार 209, कळमेश्वर- 2 हजार 146,
पारशिवनी-2 हजार 39, उमरेड-1 हजार 880, मौदा-1
हजार 834, काटोल-1 हजार 730, भिवापूर- 1 हजार
111, रामटेक-1 हजार 730, नरखेड 1 हजार 541 तर
कुही- तालुक्यात 1 हजार 291 नागरिकांना एकाच दिवशी
लस देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 7 लक्ष 28 हजार लसीकरण
दुसरा
लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 7 लाख 27
हजार 758 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये
पहिला डोस 5 लाख 86 हजार 560 नागरिकांनी घेतला
आहे. डोस 1 लाख 41 हजार 198 नागरिकांनी
घेतला आहे. यामध्ये 60 वर्षांवरील 70 टक्के नागरिकांनी
पहिला डोस घेतला आहे. 35 टक्के नागरिकांनी दुसरा
डोस घेतला आहे. 60 वर्षांवरील नागरिकांची प्राधान्यांने
लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर स्वतंत्र व्यवस्था
करण्यात आली आहे. नागरिकांनी लसीकरण मोहिमेत
मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर
यांनी केले आहे.

लसीकरण मोहिमेंतर्गत प्रत्येक गावात जनजागृती करुन
नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात
आले आहे. यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर
करण्यात येत आहे. गावनिहाय नोडल अधिकाऱ्यांची
नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक घरांचे सर्वेक्षण
करुन कुटुंबाची माहिती सुद्धा संकलित करण्यात येत आहे.
पारशिवनी तालुक्यातील आदिवासी तसेच अति दुर्गम अशा
चारगाव, घाटपेंढरी, तालीटोला, तिरंगीसर्रा, बेलडा,
कारवाही आदी नवेगावखैरी प्राथमिक केंद्र अंतर्गत
येणाऱ्या आदिवासी गावांना भेट देवून त्यांना लसीकरणाचे
महत्त्व समजावून सांगितल्यामुळे या गावांमध्ये
लसीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुख्य
कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *