- नागपुर समाचार, मनपा

प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार  करावा : महापौर दयाशंकर तिवारी मनपामध्ये योग दिन साजरा : पदाधिकारी व अधिका-यांनी केली योगसाधना  

नागपूर, ता. २१ : स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्याच हातात असते. कोरोनाच्या या संकटात आरोग्याकडे होणा-या दुर्लक्षामुळे भोगावे लागलेल्या परिणामाची प्रचिती आली. एकीकडे डॉक्टर्स व त्यांची चमू रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी अहोरात्र धडपड करीत आहेत. कोरोनापासून बचावासाठी योगासन, प्राणायाम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. योग हा निरोगी जीवनाचा मंत्र आहे. त्याचा प्रत्येकाने अंगीकार करावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने केले आहे.

            कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता सोमवारी (ता.२१) मनपा मुख्यालय परिसरात प्रातिनिधिक स्वरूपात सिमित संख्येत योग दिन नागपूर महानगरपालिका व जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, राजेश भगत, रवींद्र भेलावे, मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता अजय पोहेकर,  निगम सचिव डॉ. रंजना लाडे, आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांच्यासह मनपाच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी शहरातील जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे योगशिक्षक जयंत काते व अक्षय पटवर्धन यांनी योगाभ्यासाचे धडे दिले. सर्व पदाधिकारी व अधिकारी यांनी योगसाधना करीत निरोगी जीवनाचा संदेश दिला.

            पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, कोरोनाच्या या काळात ‘इम्यूनिटी’ अर्थात प्रतिकारशक्ती आणि ‘इम्यूनिटी बुस्टर’ हे दोन शब्द बरेच प्रचलित झाले. संपूर्ण योग प्रक्रियेमध्ये आपली प्रतिकारक्षमता व्यवस्थित करण्याचे शिकविले जाते. नियमित योग केल्याने रोग प्रतिकारक क्षमता दृढरित्या शरीरात समाविष्ठ होते. आपली प्रतिकारक्षमता व्यवस्थित होण्यासाठी व प्रभावी बनण्यासाठी नियमित योगसाधना अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असेही आवाहन त्यांनी केले.

            मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनीही यावेळी नगरवासीयांना निरोगी जीवनासाठी योग करण्याचा संदेश दिला. कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येकाला योगाचे महत्व कळले आहे. आपले आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योग हे अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या घरी, उपलब्ध जागेमध्ये योग करावे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यात लाभ होईल. लहान मुलांपासून ते वयस्कांपर्यंत प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योग करावे. आज योगाचे महत्व जगभर कळाले आहे, त्याचेच परिणाम म्हणून आपण जागतिक योग दिन साजरा करीत आहोत. जगामध्ये प्रत्येक देशाने योगाचे महत्व ओळखले आहे. आपण सुद्धा योगाचे महत्व ओळखून त्याचा आपल्या जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद तभाने यांनी केले. संचालन पियुष आंबुलकर तर आभार प्रदर्शन मिलींद मेश्राम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *