
नागपूर : वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने 15 ते 21 मार्च दरम्यान कडक बंधने लावली आहेत. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूरच्या रस्त्यांवर उतरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची झाडाझडती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी व पोलीस अधिकारी सोबत होते.
वाढत्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बंधने कडक करतानाच नागरिकांनी ही विनाकारण रस्त्यावर फिरू नये, अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे असे स्पष्ट आदेश मनपा प्रशासनाने जारी केले आहेत. असे असतानाही रस्त्यावर बऱ्याच प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहने दिसून आली. यामुळे मनपा आयुक्तांनी स्वतः गाडीतून उतरून अनेक वाहनांना थांबविले आणि चौकशी केली. अत्यावश्यक कामानी निघाल्याचे कारण सांगितलेल्या व्यक्तींना कागदपत्रे अथवा संबंधित पुराव्याची मागणी केली. असमाधानकारक उत्तरे देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी पोलिसांना दिले.
नागरिकांनी आदेशाचे पालन करावे, कोरोना संदर्भात असलेल्या शासनाच्या दिशा निर्देशाचेही पालन करावे असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.