- Breaking News, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : महापौरांची हेल्थ ड्रिंक विकणारे न्यूट्रीशन क्लबवर धाड

कोरोनाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन : २५ हजाराचा दंड

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (२४ फेब्रुवारी) रोजी सकाळी जुना सुभेदार ले-आऊट, शारदा चौक येथील इम्युनिटी बूस्टर हेल्थ ड्रिंक विकणा-या क्लबमध्ये छापा टाकला. यावेळी सदर क्लबमध्ये कोरोनाच्या दिशानिर्देशांचे पूर्णत: उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रसंगी महापौरांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे आणि उपद्रव शोध पथकाचे जवान होते.

शारदा चौक येथील एक छोट्याशा खोलीत नागरिकांना दावा करून कोरोना प्रतिबंधक इम्युनिटी बूस्टर काढा व ड्रिंक दिले जात असल्याची माहिती मंगळवारी (२३ फेब्रुवारी) रात्री महापौरांना प्राप्त झाली होती. क्लबचे श्री. सुमित मलिक यांनी काढा घेतल्यानंतर मास्क ही लावण्याची गरज नसल्याचा दावा केला होता. सकाळी महापौरांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, छोट्याशा ४५० वर्ग फुटाच्या खोलीत १५० पेक्षा जास्त लोक जमा असल्याचे दिसून आले. यापैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता तसेच सामाजिक अंतराचे पालनही करण्यात येत नव्हते. महापौरांनी शासनाच्या दिशानिर्देशांची पायमल्ली उडविताना बघितल्यानंतर त्यांनी उपद्रव शोध पथकाच्या जवानांना दंड लावण्याची सूचना केली. नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकल्यामुळे महापौरांनी त्यांना फटकारले तसेच महापौरांनी अश्या प्रकारे नागरिकांची दिशाभूल करणा-या संस्थेच्या विरुध्द सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले.

अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी ‘हेल्थ ड्रिंक’ विकणारे क्लब संचालक सुमीत मलिक यांच्याकडून २५ हजार रुपये दंड वसूल केला. महापौर आणि शोध पथकांच्या जवानांना पाहताच क्लबमधील नागरिकांनी पळ काढला.

नागपूरात कोरोनाचा प्रादूर्भाव सतत वाढत चालला आहे. नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकाराची भीती दिसत नाही, ही चिंतेची व अत्यंत धोकादायक बाब आहे. नागरिकांचा थोडासा बेजाबाबदारपणा हा कुणाच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे स्वत:सह इतरांनाही धोका ठरू नये यासाठी प्रत्येकाने शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *