- Breaking News, नागपुर समाचार, मिला जुला 

नागपुर : ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’साठी नगरसेवकांचे सहकार्य घ्या : महापौर

कोरोना नियंत्रण कक्षाला दिली भेट : परिस्थिती आणि नियोजनाचा घेतला आढावा

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला आहे. दररोज रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ वाढविण्यासोबतच काही बाबींवर तातडीने अंमल करावा लागेल. या सर्व कार्यात संपूर्ण नगरसेवकांचा सहभाग घेतल्यास प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, अशा सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केल्या.

कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता. २०) महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपातील कोरोना नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून उपाययोजना आणि नियोजनाबद्दलची माहिती जाणून घेतली. उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढलेली कोव्हिड रुग्णांची संख्या शहरासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. लाकडाऊन शिथिल झाल्यानंतर सुरु झालेल्या ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत नागरिकांना नियमांचे पालन करीत दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा देण्यात आली. परंतु, शासन, प्रशासनाने वारंवार सांगूनही, वेळोवेळी इशारा देऊनही दिशानिर्देशाचे पालन करता कुचराई केली. शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले. गेल्या काही दिवसात रुग्ण संख्येत झालेल्या वाढीने हे सिद्ध झाले आहे. मनपा प्रशासन अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत असले तरी दंड हा यावरील उपाय नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करायलाच हवे. आता मात्र कुठलीही हयगय न करता आक्रमकपणे कोरोना रुग्णांची ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत नगरसेवकांचा सहभाग घ्या, अशी सूचना महापौरांनी केली.

गेल्या काही दिवसांत रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने आता कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले. यासाठी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यासोबतच होम सर्व्हेच्या चमूंमध्येही वाढ करण्यात यावी, ५ ते ८ पर्यंतचे वर्ग बंद तातडीने बंद करण्यात यावे, महाविद्यालयाचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने पूर्वीसारखे घेण्यात यावे, शिकवणी वर्गांना भेट देण्यात यावी.

ज्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे, असे शिकवणी वर्ग बंद करण्यात यावे, सर्व वर्ग एकावेळी बंद न करता ज्या वर्गात नियम पाळल्या जात नाही, असेच वर्ग बंद करण्यात यावे, शहरातील सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवरील कारवाई कडक करण्यात यावी, ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक गर्दी दिसेल त्या प्रतिष्ठानांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, कोरोना नियंत्रण कक्षात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे, ज्या परिसरातून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह येत असतील अशा परिसरात शंभर टक्के व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात यावी, आर. आर. टी. चमूंची संख्या वाढवावी, कोरोना रुग्णांचे समुपदेशन करण्यात यावे, आणि नगरसेवकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना संपर्क करीत जनजागृती करण्याचीही सूचना महापौरांनी यावेळी केली. आशा वर्कर आणि परिचारिकांचीही संख्या वाढविण्याचीही सूचना केली. या सर्व मुद्यांसंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

तत्‌पूर्वी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांनी महापौरांना कोरोना नियंत्रण कक्षामधून केल्या जाणाऱ्या कामाची माहिती दिली. नियंत्रण कक्षामधून नागरिकांना खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये असलेल्या रिक्त खाटांची माहिती दिली जाते तसेच कोरोना लसीकरणासाठी ज्यांचे नाव आहे त्यांना दूरध्वनीद्वारे सूचना दिली जाते, असेही त्यांनी सांगितले. कोरोना नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२१ असा असून यासंदर्भात विविध माध्यमातून प्रसिद्धी केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.