- Breaking News, कोविड-19, नागपुर समाचार, मनपा

नागपुर : उपराजधानीत पहिल्या टप्प्यात २० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार कोरोनाची लस

नागपूर : उपराजधानीत पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवेत काम करणाऱ्या जवळपास २० हजार कर्मचाऱ्यांना करोनाची लस दिली जाईल. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत ६६ रुग्णालयांनी डेटाबेस भरून मनपाकडे यादी दिली आहे. ही नोंदणी शहरातील रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांची संख्या पाहता कमी आहे. त्यामुळे उपराजधानीतील रूग्णालयांनी डेटाबेस भरून यादी सादर करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

केंद्र सरकारने तीन टप्प्यांत करोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. यात डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, रुग्णालयातील इतर सर्व कर्मचारी यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइनवर काम करणारे पोलिस, होमगार्ड, मनपा कर्मचारी व इतर सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, तिसऱ्या टप्यात सर्वप्रथम ५० वर्षांवरील व त्यानंतर यापेक्षा कमी वयाच्या इतर सर्व वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात १ कोटींचे लक्ष्य ठरविले आहे. यातील १५ ते २० हजाार नागपूरकर असतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सध्या कोणती लस देणार, हे निश्चित नसले तरी भारतात तयार झालेली लस देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाची लस ५ ते ७ अंश तापमानामध्ये साठवणूक करता येईल, अशी लस साठवण्यासाठी शहरात पुरेशा कोल्ड स्टोरेज उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

करोना लसीबाबत आयएमए व इतर संस्थाांमध्ये असलेले संभ्रम दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत आरोग्य सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांची नोंदणी होणार नाही, अशांना लस देता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. दुसऱ्या टप्प्यातही फ्रंटलाइनवर काम करणारे त्या त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. त्यांची वैयक्तिक नोंदणी होईल. तूर्तास, लस घेणे कुणालाही बंधनकारक वा ऐच्छिक करण्यात आली नाही, असेही आयुक्तांनी साांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *