- Breaking News, Meeting, नागपुर समाचार

नागपुर समाचार : आयुष्मान कार्ड ई-केवायसीच्या 100 टक्के उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य ठेवा – जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

नागरिकांनी ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्ह्यात १८ मे ते १८ जून दरम्यान राबविली जाणार मोहीम

नागपूर समाचार : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड ई-केवायसी करण्यासाठी ग्रामीण भागात गावनिहाय तसेच शहरी भागात वॉर्डनिहाय आयुष्मान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. ही मोहीम १८ मे ते १८ जून महिनाभराच्या कालावधीत जिल्हास्तरावर राबविण्यात येणार आहे. या मोहीमेंतर्गत १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणेला दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज ई-केवायसी मोहीमेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते. 

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना राज्यात एकत्रित स्वरुपात राबविण्यात येत आहेत.

प्रति वर्ष प्रति कुटुंब ₹५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार देशातील कोणत्याही सूचिबद्ध सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात करण्यात येतात. 

प्रशासकीय यंत्रणेसोबतच लोकसहभागातून ही मोहीम यशस्वी करावी, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी गावनिहाय आयुष्मान शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आयुष्यमान कार्ड अनिवार्य असून ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे.

जिल्हास्तरीय प्रशिक्षणाला सुरुवात

रेशन दुकानदार, ई-केवायसी केंद्र चालक तसेच आशा वर्कर यांना प्रशिक्षण देण्यात येत असून १७ मेपर्यंत हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे.