नागपूर समाचार : उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी गॅस ग्राहकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था गॅस एजन्सीमार्फत त्यांच्या कार्यालयात असणे आवश्यक आहे. कोणत्याही ग्राहकांना उन्हात थांबावे लागू नये याची काळजी घेण्याचे निर्देश सर्व गॅस एजन्सी चालकांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी दिले होते. या निर्देशान्वये आता गॅस एजन्सीमार्फत ग्राहकांना योग्य त्या सुविधा पुरविल्या जात आहेत.
शेड व सावलीची व्यवस्था
गॅस वितरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी गॅस एजन्सींनी तातडीने शेडची व्यवस्था करणे आवश्यक आहे. आता ही व्यवस्था होत असल्यामुळे भरउन्हात उभे राहणाऱ्या ग्राहकांचे उष्माघातापासून संरक्षण होत आहे.
स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे नियोजन
प्रत्येक केंद्रावर ग्राहकांसाठी पुरेसे आणि स्वच्छ पिण्याचे पाणी गॅस एजन्सीजने उपलब्ध करून देणे आवश्यक. त्यानुसार शहर व ग्रामीण भागातील केंद्रांवर ही सुविधा दिली जात आहे.
शिस्तबद्ध वितरण व वेळेचे व्यवस्थापन
केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी वितरणाची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आणि वेळेचे चोख नियोजन करून राबवण्यावर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी भर दिला आहे. तालुका स्तरावर निरीक्षण अधिकारी तसेच नागपूर (शहर) येथे परिमंडळ अधिकाऱ्यांमार्फत याचे संनियंत्रण केले जात आहे. यामुळे अपवादात्मक परिस्थिती वगळता सर्व गॅस एजन्सीज खबरदारी घेत आहेत.
ग्राहकांना मिळाला दिलासा
जिल्ह्यातील गॅस पुरवठा व त्याचे गॅस एजन्सीमार्फत सुरळीत वितरण होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद हे स्वत: दररोज आढावा घेत आहेत. यातील येणाऱ्या अडचणी या गॅस कंपनी व एजन्सी यांच्या परस्पर समन्वयातून सुटल्या जाव्यात यावर प्राधान्य दिल्याने आता वितरणात सुरळीतपणा आला आहे. गॅसच्या वितरणासह या आढावा बैठकांमधून ग्राहकांच्या हक्काचे रक्षण व त्याबाबत एजन्सीमार्फत काळजी घेण्याला प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यामुळे यात ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.




